राज्यात पत्रकारांसाठी विमा संरक्षणाचा नवा आदर्श:पंढरपुरातून मराठी पत्रकार संघाचा राज्यातील पहिला उपक्रम: सर्व सदस्यांना १० लाखांचे अपघाती विमा कवच
राज्यात पत्रकारांसाठी विमा संरक्षणाचा नवा आदर्श:पंढरपुरातून मराठी पत्रकार संघाचा राज्यातील पहिला उपक्रम: सर्व सदस्यांना १० लाखांचे अपघाती विमा कवच
पंढरपूर :पत्रकारांच्या सामाजिक सुरक्षिततेबरोबरच आर्थिक संरक्षणालाही बळ देणारा राज्यातील पहिला उपक्रम पंढरपूर येथे साकार झाला आहे. मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र शाखा पंढरपूरच्या पुढाकारातून शहर व तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि सदस्यांची इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत खाती उघडून प्रत्येक पत्रकारासाठी बजाज अलायन्स कंपनीमार्फत १० लाख रुपयांचा अपघाती विमा उतरविण्यात आला. पत्रकार बांधवांसाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरणार असल्याची माहिती संघाचे प्रदेश सचिव हरिभाऊ प्रक्षाळे यांनी दिली.
पंढरपूर येथील पत्रकार भवनात आयोजित कार्यक्रमात मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. प्रदेश सचिव हरिभाऊ प्रक्षाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहराध्यक्ष अपराजित सर्वगोड आणि तालुकाध्यक्ष मिलिंद यादव यांनी या उपक्रमाचे नेतृत्व केले.
कार्यक्रमाला पंढरपूर डाक विभागाचे अधीक्षक मुन्ना कुमार, पोस्टमास्टर सोमनाथ गायकवाड तसेच जागतिक मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष कल्याण कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्री विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित पाहुण्यांचा मराठी पत्रकार संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी डाक विभागाचे अधीक्षक मुन्ना कुमार आणि पोस्टमास्टर सोमनाथ गायकवाड यांनी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या विविध बँकिंग सेवा, बचत योजना, विमा सुविधा तसेच भारतीय डाक विभागामार्फत नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती दिली. पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या डाक चौपाल उपक्रमाअंतर्गत उपलब्ध सुविधा आणि लाभांविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले.
पत्रकारांना संकटकाळात आर्थिक आधार मिळावा आणि त्यांच्या कुटुंबाला संरक्षणाचे कवच मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. पंढरपूरातून सुरू झालेली ही अभिनव संकल्पना राज्यातील इतर जिल्ह्यांनाही मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
याप्रसंगी विनोद पोतदार, दत्ता पाटील, राजकुमार शहापूरकर, रामकृष्ण बिडकर, संतोष कसगावडे, कबीर देवकुळे, अरुण जाधव, विकास सरवळे, विठ्ठल जाधव, पोस्टमन अमित शिर्के, शशिकांत आयतोडे, आनंदा गाडेकर, सतीश इरकर, राजकुमार मोहिते, विलास सोनवणे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल माने यांनी केले, तर सूत्रसंचालन बालम मुलानी यांनी प्रभावीपणे पार पाडले.





