कामशेतचे ज्येष्ठ समाजसेवक सुकानराज बाफना अनंतात विलीन
कामशेतचे ज्येष्ठ समाजसेवक सुकानराज बाफना अनंतात विलीन
कामशेत : भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हा चिटणीस, जैन इंग्लिश स्कूल, कामशेतचे संस्थापक अध्यक्ष, देवराई संस्थेचे विद्यमान अध्यक्ष तसेच ज्येष्ठ समाजसेवक सुकानराज अदाजी बाफना यांचे शुक्रवार (दि. १० जुलै २०२६) रोजी रात्री ८ वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने कामशेत परिसरासह सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
सुकानराज बाफना यांनी सामाजिक बांधिलकी जपत शिक्षण, समाजसेवा आणि सार्वजनिक कार्यात उल्लेखनीय योगदान दिले. जैन इंग्लिश स्कूलच्या स्थापनेत त्यांनी मोलाची भूमिका बजावत अनेक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला दिशा दिली. देवराई संस्थेच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातूनही त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांना चालना दिली. भारतीय जनता पक्षात जिल्हा चिटणीस म्हणून कार्य करताना त्यांनी संघटन बळकट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.
त्यांच्या साधेपणामुळे, सेवाभावी वृत्तीमुळे आणि सर्वसामान्यांशी जपलेल्या आत्मीय नात्यामुळे समाजात त्यांना विशेष मानाचे स्थान प्राप्त झाले होते. त्यांच्या निधनाने विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिकांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
सुकानराज अदाजी बाफना यांची अंत्ययात्रा शनिवार, दि. ११ जुलै २०२६ रोजी दुपारी ३ वाजता कामशेत येथील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. विक्रम बाफना व बिपीन बाफना त्यांचे पुत्र होत.





