आरोग्यविम्यात माहिती लपविली तर ‘सुरक्षा कवच’ ठरते कागदी; दावा अमान्य, पॉलिसीही रद्द
आरोग्यविम्यात माहिती लपविली तर ‘सुरक्षा कवच’ ठरते कागदी; दावा अमान्य, पॉलिसीही रद्द
लोनावळा::
आरोग्य विमा म्हणजे भविष्यातील वैद्यकीय खर्चावर टाकलेले आर्थिक संरक्षणाचे छत्र. स्वतःसह कुटुंबातील सर्व सदस्यांचा आरोग्य विमा काढण्याकडे नागरिकांचा कल वाढत असला, तरी विमा घेताना दिली जाणारी माहिती अचूक आणि पूर्ण असणे तितकेच महत्त्वाचे ठरत आहे. आधी झालेले ऑपरेशन, गंभीर आजार, अपघातातील जखमा किंवा दीर्घकाळ घेतलेले उपचार यांची माहिती लपविल्यास विमा कवच क्षणातच निष्प्रभ ठरू शकते.
विमा कंपनीच्या अटी व नियमांनुसार पॉलिसी घेण्यापूर्वी आरोग्यविषयक सर्व तपशील जाहीर करणे बंधनकारक आहे. या माहितीच्या आधारेच कंपनी जोखीम ठरवते आणि कव्हरेज मंजूर करते. काही आजारांसाठी प्रतीक्षा कालावधी असतो, तर काही आजार पॉलिसीमध्ये थेट समाविष्टही असतात. मात्र, माहिती लपवून पॉलिसी घेतली असल्याचे दाव्याच्या वेळी उघड झाल्यास कंपनी दावा अमान्य करतेच, शिवाय करारभंगाचा ठपका ठेवत संपूर्ण पॉलिसी रद्दही करू शकते.
अनेक वेळा “आता काही त्रास नाही” किंवा “लहान ऑपरेशन होते” अशा समजुतीतून विमाधारक माहिती दडपतात. पण दावा करताना वैद्यकीय कागदपत्रांची सखोल तपासणी होत असल्याने ही बाब सहज उघड होते. परिणामी, गरजेच्या वेळी विमा संरक्षण हातातून निसटते आणि आर्थिक फटका बसतो.
या संदर्भात बोलताना एलआयसी एजंट विकी कडू म्हणाले, “विमा म्हणजे विश्वासावरचा करार आहे. आरोग्यविषयक एकही बाब लपवू नये. पूर्ण आणि खरी माहिती दिल्यासच पॉलिसी खऱ्या अर्थाने सुरक्षा देते. अन्यथा दावा तर जातोच, पण पॉलिसी रद्द होण्याचा धोका कायम राहतो.”
म्हणूनच विमा घेताना पारदर्शकता ठेवणे हीच खरी शहाणपणाची गुंतवणूक ठरते.





