उद्योग

तळेगावचा आठवडे बाजार प्रशासनाची उदासीनता आणि नागरिकांचा कोंडलेला श्वास


तळेगावचा आठवडे बाजार प्रशासनाची उदासीनता आणि नागरिकांचा कोंडलेला श्वास

तळेगाव दाभाडे:
तळेगाव दाभाडे येथील दर रविवारी भरणारा आठवडे बाजार हा परिसरातील अर्थकारणाचा कणा मानला जातो. शहरासह आजूबाजूच्या गावांतील, वाडी-वस्तीवरील नागरिकांची खरेदी-विक्री याच बाजारावर अवलंबून आहे. मात्र, हा बाजार सध्या गरजांपेक्षा गैरसोयींचे प्रतीक बनत चालला आहे. नियोजनाअभावी, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे आणि अंमलबजावणीच्या अभावामुळे तळेगावचा आठवडे बाजार म्हणजे नागरिकांच्या संयमाची परीक्षा ठरत आहे.

बाजाराचे वाढते स्वरूप आणि त्यासोबत वाढणारे अतिक्रमण हे तळेगावसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. मुख्य रस्ते, चौक, शाळा परिसर आणि अंतर्गत मार्गांवर बिनधास्तपणे उभारलेले गाडे, हातगाड्या व दुकाने यामुळे वाहतुकीचा पूर्णत: बोजवारा उडतो. रविवारी तर संपूर्ण गाव वाहतूक कोंडीत अडकते. रुग्णवाहिका, अग्निशमन वाहनांसारख्या अत्यावश्यक सेवांना वाट मिळणे कठीण होते, ही बाब अत्यंत गंभीर आहे. याकडे दुर्लक्ष होणे म्हणजे संभाव्य दुर्घटनांना निमंत्रण देण्यासारखेच आहे.

ध्वनी प्रदूषण हा आणखी एक दुर्लक्षित प्रश्न आहे. कर्णकर्कश भोंगे, मोठ्या आवाजातील जाहिराती यामुळे लहान मुले, वृद्ध आणि आजारी नागरिक त्रस्त होतात. यासोबतच पाकीटमार, मोबाईल चोरीसारख्या घटनांमध्ये झालेली वाढ ही कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने चिंताजनक आहे. बाजार भरतो, पण सुरक्षिततेची जबाबदारी मात्र कुणीही स्वीकारताना दिसत नाही.

विशेष म्हणजे या समस्यांकडे प्रशासन पूर्णपणे अनभिज्ञ आहे असे नाही. मागील सात-आठ महिन्यांपासून व्यापारी, नागरिक, सामाजिक कार्यकर्ते सातत्याने पाठपुरावा करत आहेत. एप्रिल २०२५ मध्ये नगरपरिषद, पोलीस प्रशासन, वाहतूक पोलीस, व्यापारी आणि नागरिक यांच्यात संयुक्त बैठका पार पडल्या. बैठकीत उपाययोजनांवर चर्चा झाली, आश्वासने देण्यात आली. काही काळासाठी रस्ते मोकळे ठेवण्यात आले, पार्किंगची व्यवस्था करण्यात आली. मात्र, ही अंमलबजावणी तात्पुरती ठरली. नियोजन कागदावर राहिले आणि प्रत्यक्षात परिस्थिती ‘जैसे थे’च राहिली.

यातून एकच गोष्ट स्पष्ट होते—प्रशासनाकडे इच्छाशक्तीचा अभाव आहे. बाजाराचे नियोजन हे केवळ बैठका घेऊन किंवा आदेश काढून होत नाही; त्यासाठी सातत्यपूर्ण अंमलबजावणी, कडक कारवाई आणि समन्वय आवश्यक असतो. परप्रांतीय विक्रेत्यांची कागदपत्र तपासणी, अतिक्रमणाविरोधात ठोस पावले, वाहतुकीसाठी स्पष्ट मार्ग, पार्किंगची सक्ती यासारख्या उपाययोजना केवळ कागदावर न राहता रस्त्यावर दिसल्या पाहिजेत.

तळेगावचा आठवडे बाजार बंद करणे हा उपाय नाही, तर तो शिस्तबद्ध आणि सुरक्षित करणे हीच काळाची गरज आहे. प्रशासनाने नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नये. अन्यथा ‘आठवडे बाजार’ ही सुविधा न राहता, प्रशासनाच्या अपयशाचे जिवंत उदाहरण म्हणूनच ओळखली जाईल.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *