महत्त्वाचेसामाजिक

कान्हे रेल्वे गेट तीन दिवस बंद.वाहतुकीचा खोळंबा, उड्डाणपुलाची मागणी जोर धरू लागली


कान्हे रेल्वे गेट तीन दिवस बंद.वाहतुकीचा खोळंबा, उड्डाणपुलाची मागणी जोर धरू लागली

 

कान्हे:

मावळ तालुक्यातील वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला कान्हे फाटा (गेट क्रमांक ४५) येत्या १६ ते १८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस काही तांत्रिक व देखभाल कामांमुळे पूर्णपणे बंद राहणार आहे. या कालावधीत पुणे–लोणावळा तसेच औद्योगिक व ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

 

रेल्वे प्रशासन व संबंधित यंत्रणेकडून करण्यात येणाऱ्या कामामुळे हा निर्णय घेण्यात आला असून, नागरिकांनी व वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः जांभूळ अंडरपास हा पर्यायी मार्ग वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र या अंडरपासची रुंदी मर्यादित असल्याने अवजड वाहनांसाठी तो अपुरा पडत असल्याचे चित्र आहे.

 

कान्हे फाटा हा परिसर औद्योगिक, शैक्षणिक तसेच ग्रामीण भागाला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. दररोज हजारो खासगी वाहने, एसटी बस, मालवाहतूक करणारी अवजड वाहने या मार्गावरून ये-जा करतात. गेट बंद राहिल्यास वाहतूक कोंडी, वेळेचा अपव्यय आणि अपघातांचा धोका वाढण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

 

दरम्यान, कान्हे फाटा येथे कायमस्वरूपी उड्डाणपूल उभारण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. मागील अनेक वर्षांपासून या ठिकाणी उड्डाणपूल व्हावा, अशी मागणी स्थानिक नागरिक, व्यापारी व प्रवासी करत आहेत. गेट बंद राहिल्यामुळे होणाऱ्या त्रासातून हा प्रश्न किती गंभीर आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

 

प्रशासनाने तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी दीर्घकालीन उपाय म्हणून उड्डाणपूल उभारणीला प्राधान्य द्यावे, अन्यथा भविष्यातही अशाच समस्या वारंवार निर्माण होतील.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *