ताज्या घडामोडीमहत्त्वाचेशहरसामाजिक

तळेगाव दाभाडे शहराचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज उत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन


तळेगाव दाभाडे शहराचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज उत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

 

 

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे शहराचे जागृत ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज यांच्या वार्षिक उत्सवाला उद्या गुढीपाडव्याच्या (ता. १९) शुभमुहूर्तावर प्रारंभ होत असून, संपूर्ण शहरात भक्तिभाव आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. उत्सवाची सर्व तयारी पूर्ण झाली असून, भाविकांच्या सहभागासाठी विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि क्रीडा कार्यक्रमांचे आकर्षक नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष अक्षय अशोक पाटोळे व उपाध्यक्ष योगेश विलास भेगडे यांनी दिली.

 

गुढीपाडव्याच्या पवित्र सकाळी श्रींचा अभिषेक विधिवत पार पडणार आहे. त्यानंतर सायंकाळी नाथांच्या पालखीचा पारंपरिक छबिना मोठ्या उत्साहात ग्रामप्रदक्षिणेसाठी मार्गस्थ होईल. यावेळी ढोल-ताशांचा गजर, फुलांची उधळण आणि भक्तांचा जयघोष यामुळे वातावरण भक्तिमय होणार आहे. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता दर्शनासाठी महिलांसाठी स्वतंत्र रांग आणि विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

 

उत्सवाच्या निमित्ताने तळेगावमध्ये विविध कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. गुरुवार (ता. १९) आणि शुक्रवार (ता. २०) रोजी गणपती माळ (तळ्याच्या काठी) येथे पारंपरिक बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे. या शर्यतींमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी तब्बल चार लाख २५ हजार रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. याशिवाय दुचाकी, कुट्टी मशीन, फ्रीज, कूलर आणि आकर्षक चषक अशी पारितोषिकेही विजेत्यांना देण्यात येणार आहेत.

 

गुरुवारी रात्री घोरावाडी रेल्वे स्टेशनजवळील मरी माता मैदानात लोकनाट्य तमाशाचा रंगतदार कार्यक्रम सादर होणार असून, श्री डोळसनाथ मंदिर परिसरात रंगीत संगीत भजनी भारुडाची मैफल रंगणार आहे. रविवारी (ता. २२) मंदिर प्रांगणात भजन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, स्थानिक कलावंतांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे.

 

सोमवारी (ता. २३) रात्री मारुती मंदिर चौक येथे प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामुळे तरुणाईत विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. यंदाच्या उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणारा निकाली कुस्त्यांचा भव्य आखाडा मंगळवारी (ता. २४) भोईआळी मळा येथे रंगणार आहे. या स्पर्धेसाठी विजेत्या मल्लांना तब्बल १० लाख १० हजार १०१ रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले आहे. काही निवडक कुस्त्यांसाठी चांदीची गदा हे विशेष आकर्षण ठरणार असून, या स्पर्धांचे निवेदन प्रसिद्ध कुस्ती निवेदक हंगेश्वर धायगुडे करणार आहेत.

 

एकूणच, धार्मिक परंपरा, सांस्कृतिक वैभव आणि क्रीडारंजन यांचा संगम साधणारा श्री डोळसनाथ महाराज उत्सव तळेगावकरांसाठी व पै पाहुण्यांकरिता एक पर्वणी ठरणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *