महत्त्वाचेराजकीय

इंदोरीत ‘कमळ’ फुलणारच मेघाताई भागवतांचा भाजपमध्ये प्रवेश इंदोरी गटातून अधिकृत उमेदवारी जाहीर


इंदोरीत ‘कमळ’ फुलणारच मेघाताई भागवतांचा भाजपमध्ये प्रवेश इंदोरी गटातून अधिकृत उमेदवारी जाहीर

इंदोरी (मावळ) :

मावळ तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजताच राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाली असून, इंदोरी गटात मात्र राजकारणाने थेट ‘हाय व्होल्टेज’ वळण घेतले आहे. जनसंपर्क, विकासकामे आणि ठाम नेतृत्वाच्या जोरावर जनतेच्या मनात आपले स्थान निर्माण करणाऱ्या लोकप्रिय नेत्या मेघाताई प्रशांत भागवत यांनी शनिवारी भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश करून राजकीय समीकरणे ढवळून काढली.

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. फटाक्यांच्या आतषबाजीसह, कार्यकर्त्यांच्या जल्लोषात आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या गजरात हा सोहळा साजरा झाला. यावेळी भाजपने मेघाताई भागवत यांना इंदोरी जिल्हा परिषद गटातून अधिकृत उमेदवारी जाहीर केल्याने इंदोरी गटातील निवडणूक चुरसदार बनली आहे.

मेघाताई भागवत या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य, महिला सक्षमीकरण, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील कामांमुळे जनतेत विश्वासार्ह चेहरा म्हणून ओळखल्या जातात. “काम बोलते, शब्द नव्हे” या भूमिकेतून त्यांनी इंदोरी परिसरात विकासाची नवी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे पक्षाला स्थानिक पातळीवर भक्कम ताकद मिळाल्याचे बोलले जात आहे.

पक्षप्रवेशानंतर प्रतिक्रिया देताना मेघाताई भागवत म्हणाल्या, “विकासाच्या या प्रवासात सहभागी होताना मला अत्यंत आनंद होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या मंत्रावर माझा ठाम विश्वास असून, इंदोरी गटाचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास आहे. सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी मी नेहमीच रस्त्यावर उतरणार आहे.”

या कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, विधानसभा प्रचार प्रमुख रवींद्र आप्पा भेगडे, माजी संचालक बाळासाहेब नेवाळे, माजी सभापती निवृत्तीभाऊ शेटे, माजी तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, माजी सभापती गुलाबराव म्हाळस्कर यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनीच मेघाताईंवर विश्वास व्यक्त करत “इंदोरी गटात भाजपचा विजय निश्चित” असा सूर लावला.

निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे मावळ तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. मेघाताई भागवत यांच्या प्रवेशामुळे इंदोरी गटात भाजपने तगडा डाव टाकल्याचे चित्र असून, विरोधकांच्या गोटात मात्र अस्वस्थता पसरल्याचे दिसून येत आहे. इंदोरी गटातील ही लढत आता प्रतिष्ठेची ठरणार, हे मात्र नक्की.

मेघाताई भागवत या विकासकामांची ओळख आहेत. त्यांनी गावागावातील प्रश्न समजून घेऊन प्रामाणिकपणे काम केले आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्याने इंदोरी गटाचा विकास अधिक वेगाने होईल. येणाऱ्या निवडणुकीत मेघाताईंचा विजय निश्चित आहे, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *