राजगुरव कॉलनीत उद्या श्री गणेश प्रतिष्ठानचा भक्ती–सांस्कृतिक महोत्सव
राजगुरव कॉलनीत उद्या श्री गणेश प्रतिष्ठानचा भक्ती–सांस्कृतिक महोत्सव
तळेगाव दाभाडे :
राजगुरव कॉलनी, तळेगाव स्टेशन येथील श्री गणेश प्रतिष्ठानच्या वतीने गुरुवार, दि. २२ जानेवारी २०२६ रोजी श्री गणेश जयंतीनिमित्त भक्ती–सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दिवसभर चालणाऱ्या विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांमुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण होणार असून नागरिक व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाकडून करण्यात आले आहे.
महोत्सवाची सुरुवात सकाळी ६ वाजता श्री गणेशाच्या अभिषेकाने होणार आहे. त्यानंतर सकाळी ७ वाजता श्री गणेश यागाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता राजगुरव कॉलनीतील महिलांच्या सहभागातून सामूहिक अथर्वशीर्ष पठण होणार असून महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अपेक्षित आहे. सकाळी ११ वाजता गौरी गणेश महिला भजनी मंडळ, राजगुरव कॉलनी यांच्या भजन सादरीकरणाने भक्तीची अनुभूती मिळणार आहे.
दुपारी १२.१५ वाजता श्री गणेश जन्मोत्सव साजरा करण्यात येणार असून आमदार सुनिल (आण्णा) शंकरराव शेळके यांच्या हस्ते महाआरती संपन्न होईल. दुपारी १ वाजता स्वरांजली भजनी मंडळाचे भक्तीगीतांचे सादरीकरण होणार आहे. याचवेळी दुपारी १२.३० ते ३ वाजेपर्यंत श्री गणेश मंदिर प्रांगणातील सुशोभीकरणाचा शुभारंभ आमदार सुनिल (आण्णा) शेळके यांच्या शुभहस्ते होणार असून भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी ७ वाजता तळेगाव परिसरातील आंतरशालेय समूह नृत्य स्पर्धेच्या विजेत्यांचा बक्षीस वितरण समारंभ पार पडणार आहे. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळणार असून पालक व नागरिकांची मोठी उपस्थिती अपेक्षित आहे. या नृत्य स्पर्धेचे उद्घाटन तळेगाव दाभाडे नगर परिषद प्रशासन अधिकारी श्रीमती अनिता वैद्य यांच्या हस्ते होणार आहे.
या महोत्सवासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुनिल (आण्णा) शंकरराव शेळके, नगराध्यक्ष संतोष दाभाडे, मुख्याधिकारी गिरीष दापकेकर, नगरसेविका सौ. अश्विनीताई शेळके, नगरसेविका सौ. शैलजाताई काळोखे तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविका उपस्थित राहणार आहेत.
श्री गणेश प्रतिष्ठानचे विश्वस्त अध्यक्ष दिलीपशेठ राजगुरव, उपाध्यक्ष बच्चुशेठ तांबोळी, खजिनदार धनंजय गुणे, सचिव प्रा. जीवन पाटील यांच्यासह सर्व सदस्यांनी कार्यक्रमाचे काटेकोर नियोजन केले आहे. धार्मिक परंपरा, सांस्कृतिक जतन आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देणाऱ्या या महोत्सवाचा लाभ भाविक व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.





