सामाजिक

*किल्ले लोहगड–विसापूर अभ्यासवर्गातून दुर्गजागर इतिहास.संवर्धन व संघटनाचा त्रिवेणी संगम*


किल्ले लोहगड–विसापूर अभ्यासवर्गातून दुर्गजागर इतिहास.संवर्धन व संघटनाचा त्रिवेणी संगम

तळेगाव दाभाडे:

सह्याद्रीच्या कुशीत दिमाखाने उभे असलेले किल्ले लोहगड व विसापूर केवळ दगड–मातीचे अवशेष नसून ते मराठेशाहीच्या तेजस्वी इतिहासाची साक्ष देणारे जिवंत दस्तऐवज आहेत. या दुर्गवैभवाचा शास्त्रशुद्ध अभ्यास, संवर्धनाची जाणीव आणि पुढील पिढीपर्यंत वारसा पोहोचवण्याच्या उद्देशाने श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, लोहगड विसापूर विकास मंच व श्री शिवशंभू विचार मंच महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले लोहगड–विसापूर अभ्यासवर्गाचे भव्य आयोजन करण्यात आले.

या अभ्यासवर्गाचे उद्घाटन तळेगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संदीपभाऊ जाधव यांच्या हस्ते झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. उद्घाटनप्रसंगी बोलताना प्रमुख पाहुण्यांनी भारतीय इतिहास, विशेषतः मराठेशाहीच्या भूगोलिक व लष्करी मांडणीचा अभ्यास करण्यासाठी अशा अभ्यासवर्गांचे महत्त्व अधोरेखित केले. इतिहास केवळ पुस्तकात न राहता प्रत्यक्ष गडकोटांवर अनुभवला गेला पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी केले.

अभ्यासवर्गाच्या पहिल्या सत्रात ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. प्र. के. घाणेकर यांनी लोहगड व विसापूर किल्ल्यांची स्थापत्यशास्त्रीय वैशिष्ट्ये, जलव्यवस्था, तटबंदी व नैसर्गिक रचना यांचे सखोल विश्लेषण केले. दुर्गरचनेमागील शास्त्र, भौगोलिक निवड आणि संरक्षणात्मक दृष्टिकोन त्यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने उलगडून सांगितला.

द्वितीय सत्रात लोहगड–विसापूर विकास मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे व संदीप गाडे यांनी मंचाच्या २५ वर्षांच्या वाटचालीचा लेखाजोखा मांडला. ‘संघटन मावळ्यांचे, संवर्धन गड-किल्ल्यांचे’ या ब्रीदवाक्यानुसार केलेल्या कार्याची माहिती देताना त्यांनी आलेली आव्हाने, लोकसहभागातून साधलेली प्रगती आणि भविष्यातील नियोजन यावर प्रकाश टाकला.

तृतीय सत्रात भारतीय पुरातत्त्व विभागाचे अधिकारी गजानन मंडावरे यांनी विभागाची रचनात्मक कार्यशैली, पुणे विभागातील सुरू असलेली संवर्धन कामे तसेच पुरातत्त्व क्षेत्रातील शासकीय सेवांच्या संधी याविषयी मार्गदर्शन केले. युवकांसाठी हे सत्र विशेष प्रेरणादायी ठरले.

शेवटच्या सत्रात ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे यांनी भारतीय अतिप्राचीन इतिहासापासून शिवकालीन इतिहासापर्यंतचा प्रवास उलगडला. काळानुसार बदलणाऱ्या दुर्गरचना, त्यामागील तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक संदर्भ मांडताना त्यांनी दुर्ग हे आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहेत असे ठामपणे नमूद करून दुर्गमहती अधोरेखित केली.

समारोप सत्रात श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाह सुधीर थोरात यांनी हा अभ्यासवर्ग केवळ ऐकून न थांबता मिळालेली शिकवण आपापल्या कार्यक्षेत्रात अमलात आणण्याचे आवाहन केले.

या अभ्यासवर्गाला असंख्य इतिहासप्रेमी व अभ्यासकांची उपस्थिती लाभली. सह्याद्री इंग्लिश मिडीयम स्कूल व रा. स्व. संघाचे अविनाश भेगडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे नियोजन रुपेश मोरे, गणेश उंडे, अमोल गोरे, महेश सोनपावले, निलेश माटे, मल्हार टेकवडे, शुभम मोटे, हर्षदा धुमाळ आदी कार्यकर्त्यांनी केले. दुर्गसंवर्धनाचा हा वैचारिक जागर पुढील काळात चळवळीचे रूप घेईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *