शिवरथ यात्रेच्या साक्षीने तळेगावात शिवभक्तीचा जागर क्रिकेटपटू आदित्य माने यांचे शिवकार्यास योगदान
शिवरथ यात्रेच्या साक्षीने तळेगावात शिवभक्तीचा जागर क्रिकेटपटू आदित्य माने यांचे शिवकार्यास योगदान
तळेगाव दाभाडे :
शिवप्रेम, इतिहासाची जाणीव आणि भावी पिढीला प्रेरणा देणारा सोहळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोळाव्या शिवरथ यात्रेचे तळेगाव दाभाडे येथे उत्साहात स्वागत करण्यात आले. तळेगाव दाभाडे येथील पवित्र श्री शिवशंभू तीर्थ येथे शिवरथ यात्रेचे दुपारी चारच्या सुमारास आगमन होताच परिसर शिवघोषांनी दुमदुमून गेला.
शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी ते शिवतीर्थ किल्ले रायगड असा ऐतिहासिक आणि प्रेरणादायी प्रवास करणारी ही शिवरथ यात्रा दि. ६ व ७ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. शिवरथ यात्रेचे हे सोळावे वर्ष असून, परंपरा आणि प्रेरणेचा अखंड प्रवाह यानिमित्ताने पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला. ६ फेब्रुवारी रोजी शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी शिवजन्मस्थान पूजन करून यात्रेला प्रारंभ झाला. त्यानंतर नारायणगाव, देहू मार्गे ही यात्रा तळेगाव दाभाडे येथे दाखल झाली.
श्री शिवशंभू तीर्थ येथे झालेल्या स्वागत सोहळ्यात डॉ. प्रमोद बोराडे, डॉ. प्रवीण माने, नगरसेवक चिराग खांडगे, विनीत भेगडे, शैलेश जाधव, सचिन ढमाले, आकाश ठोंबरे, स्मारक समितीचे सदस्य तसेच असंख्य शिवभक्त नागरिक उपस्थित होते. यावेळी डॉ. प्रमोद बोराडे यांनी पालखीतील शिवरायांच्या पादुकांचे विधिवत पूजन करून यात्रेचा गौरवशाली इतिहास आणि महत्त्व उपस्थितांना कथन केले.
यात्रेचे आयोजक सचिन शेडगे यांनी “छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, त्यांचे विचार आणि राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा प्रत्येक गावापर्यंत पोहोचावी, हाच या यात्रेचा खरा उद्देश आहे,” असे सांगून यात्रेचे सामाजिक व सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित केले. उपस्थित शिवभक्तांनी शिवरायांच्या पादुकांचे दर्शन घेत छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाच्या गगनभेदी घोषणा दिल्या.
या सोहळ्याला विशेष सामाजिक अधिष्ठान मिळाले ते तळेगावचे सुपुत्र व उभरते क्रिकेटपटू आदित्य प्रवीण माने यांच्या कृतीमुळे. गुजरात येथे झालेल्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय क्रिकेट स्पर्धेत मिळालेले मानधन त्यांनी शिवकार्यास अर्पण करून शिवभक्तीचा आदर्श घालून दिला. त्यांच्या या योगदानामुळे उपस्थितांमध्ये विशेष भावनिक वातावरण निर्माण झाले असून, भावी पिढीसाठी शिवकार्याची प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
शिवभक्ती, सामाजिक जाणीव आणि युवा प्रेरणा यांचा संगम असलेली ही शिवरथ यात्रा तळेगाव दाभाडेकरांच्या स्मरणात कायमची कोरली गेली.





