उद्योग

वडगाव नगरपंचायत समितींच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व


वडगाव नगरपंचायत समितींच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व
वडगाव (ता. मावळ) — वडगाव नगरपंचायतीच्या स्थायी समिती व विविध विषय समित्यांच्या निवडणुका आज नगरपंचायत सभागृहात पार पडल्या. या निवडणूक प्रक्रियेत राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट वर्चस्व राखत सर्व महत्त्वाच्या समित्यांवर आपले नेतृत्व प्रस्थापित केले. ही संपूर्ण प्रक्रिया पिठासीन अधिकारी तथा मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
नगरपंचायतीच्या विशेष सभेत स्थायी समिती व विषय समित्यांच्या सभापतींची निवड बिनविरोध करण्यात आली. स्थायी समितीच्या सभापतीपदी नगराध्यक्षा अबोली मयूर ढोरे यांची निवड झाली. पाणीपुरवठा समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्ष सुनील गणेश ढोरे, सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी गणेश सोपान म्हाळसकर, स्वच्छता व आरोग्य समितीच्या सभापतीपदी माया अमर चव्हाण, तर महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी सुनीता राहुल ढोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवडणुकीमुळे नगरपंचायतीतील प्रशासनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व अधिक ठळक झाले असून आगामी काळात शहराच्या विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
विशेष सभेला नगराध्यक्षा अबोली ढोरे, उपनगराध्यक्ष सुनील ढोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजय म्हाळसकर, पक्षप्रतोद माया चव्हाण, भाजपचे गटनेते दिनेश ढोरे, पक्षप्रतोद अनंता कुडे यांच्यासह नगरसेवक पूनम भोसले, रोहित धडक्ले, सुनीता ढोरे, रूपाली ढोरे, विशाल वहिले, अजय भवार, सारिका चव्हाण, आकांक्षा वाघवले, गणेश म्हाळसकर, वैशाली सोनवणे, राणी म्हाळसकर तसेच स्वीकृत नगरसेवक पंढरीनाथ ढोरे व संदीप म्हाळसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
निवडणूक प्रक्रिया शांततेत व नियमबद्धरीत्या पार पडली असून नवनियुक्त सभापतींचे उपस्थित नगरसेवकांनी अभिनंदन केले. नगरविकास, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य तसेच महिला व बालकल्याण या क्षेत्रांमध्ये सकारात्मक आणि लोकाभिमुख निर्णय घेतले जातील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *