आरोग्य

भटक्या कुत्र्यांसाठी अन्न झोळी उपक्रमाचा प्रस्ताव नगरसेवक सागर बोडके, नगरसेविका सुरेखा भेगडे यांचा पुढाकार


भटक्या कुत्र्यांसाठी अन्न झोळी उपक्रमाचा प्रस्ताव
नगरसेवक सागर बोडके, नगरसेविका सुरेखा भेगडे यांचा पुढाकार

तळेगाव दाभाडे:

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत भटक्या कुत्र्यांच्या संगोपनासाठी एक अभिनव आणि समाजाभिमुख उपक्रम राबवण्याचा प्रस्ताव नगरसेवक सागर बोडके व नगरसेविका सुरेखा भेगडे यांनी मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे सादर केला आहे. “अन्न झोळी” या नावाने सुचवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे भटक्या कुत्र्यांच्या आहाराचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असून नागरिकांचा थेट सहभाग प्रशासनाच्या कामकाजात वाढणार आहे.

या प्रस्तावानुसार नगरपरिषदेच्या आरोग्य विभागामार्फत कचरा संकलनासाठी दररोज फिरणाऱ्या घंटागाडीला स्वतंत्र अन्न झोळी अथवा डबा बसवण्यात यावा. शहरातील नागरिक आपल्या घरातील उरलेले, मात्र खाण्यायोग्य अन्न जसे की चपाती, भाकरी, भाजी अथवा इतर पदार्थ या झोळीत देऊ शकतील. जमा झालेले अन्न स्वच्छतेच्या नियमांचे पालन करून भटक्या कुत्र्यांच्या निवारा केंद्रात पोहोचवले जाईल, अशी या योजनेची संकल्पना आहे.

नगरसेवक सागर बोडके आणि नगरसेविका सुरेखा भेगडे यांनी सांगितले की, या उपक्रमामुळे एकीकडे प्रशासनावर भटक्या कुत्र्यांच्या आहारासाठी होणारा अतिरिक्त आर्थिक भार कमी होईल, तर दुसरीकडे घराघरातील उरलेले अन्न वाया न जाता सामाजिक उपक्रमासाठी वापरले जाईल. अन्न झोळीमुळे श्वानांचा नियमित आहार सुनिश्चित होईल, त्यामुळे आजारांचे प्रमाण कमी होण्यास तसेच शहरातील स्वच्छतेसही हातभार लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भटक्या कुत्र्यांबाबत नागरिकांमध्ये असलेली भीती, तक्रारी आणि प्रशासनावरील दबाव लक्षात घेता, अन्न झोळी सारखा उपक्रम हा मानवी संवेदनशीलतेचा आणि शाश्वत व्यवस्थापनाचा आदर्श ठरू शकतो, असे मत नगरसेवकांनी मांडले. हा उपक्रम केवळ प्राणीमित्रत्वापुरता मर्यादित न राहता अन्न वाया घालवू नका या सामाजिक संदेशालाही बळ देणारा ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

याचबरोबर नगरसेवक बोडके आणि भेगडे यांनी नगरपरिषदेत कार्यरत कंत्राटी व रोजंदारी कामगारांसाठीही एक महत्त्वाचा प्रस्ताव प्रशासनासमोर ठेवला आहे. वाढता महागाईचा भार, घरखर्च, मुलांचे शिक्षण, कर्जहप्ते आणि त्यातून निर्माण होणारा मानसिक ताण लक्षात घेता कामगारांचे वेतन दर महिन्याच्या १ ते ५ तारखेच्या दरम्यान नियमितपणे अदा करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. वेळेवर वेतन मिळाल्यास कामगारांचे मनोबल वाढून कामाची गुणवत्ता सुधारेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात बोलताना नगरसेवक सागर बोडके म्हणाले, अन्न झोळी हा उपक्रम केवळ कल्पना नसून प्रत्यक्षात उतरवण्याजोगा आहे. नागरिक, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एकत्र आले तर शहरातील अनेक प्रश्न मानवी दृष्टिकोनातून सोडवता येतील.नगरसेविका सुरेखा भेगडे यांनीही या उपक्रमाला सर्व स्तरातून सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *