शहरसामाजिक

गोल्डन रोटरीतर्फे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा


गोल्डन रोटरीतर्फे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

 

तळेगाव दाभाडे:

लोकशाहीच्या मूल्यमंत्रांना उजाळा देत आणि देशभक्तीच्या तेजस्वी भावनेत न्हालेल्या वातावरणात रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे व प्राथमिक आरोग्य केंद्र, तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रनिर्मितीच्या मूल्यांची आठवण करून देणारा हा सोहळा सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि एकात्मतेचा जिवंत प्रत्यय देणारा ठरला.

 

या कार्यक्रमास प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज चौधरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. ध्वजारोहण रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष रो. संतोष परदेशी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी गोल्डन आरसीसी अध्यक्ष सौ. अनिता भेगडे, माजी तहसीलदार श्री. रामभाऊ माने, रो. दीपक फल्ले, रो. किरण ओसवाल, डॉ. दिनेश महालिंगे, रोट्रॅक्ट अध्यक्ष ललित देसले, सामाजिक कार्यकर्ते श्री. लक्ष्मणराव माने यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स, नर्स व आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 

ध्वजपूजनानंतर ध्वजारोहण, राष्ट्रगीत आणि प्रजासत्ताक दिनाची सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली. राष्ट्रगीताच्या स्वरांत वातावरण भारावून गेले, तर उपस्थितांच्या चेहऱ्यावर देशाभिमानाची झळाळी स्पष्टपणे दिसून येत होती. या प्रसंगी ‘सेवेतून राष्ट्रसेवा’ हा विचार केंद्रस्थानी राहिला.

 

कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरले युवा रत्न सन्मान पुरस्कार. १४ वर्षाखालील महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल तळेगावचे सुपुत्र डॉ. प्रवीण माने यांचे चिरंजीव आदित्य प्रवीण माने यांचा गौरव करण्यात आला. आदित्यच्या अनुपस्थितीत हा सन्मान त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने माजी तहसीलदार श्री. रामभाऊ माने व शिक्षण मंडळाचे माजी सदस्य श्री. लक्ष्मणराव माने यांनी स्वीकारला. युवकांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन देणारा हा क्षण उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.

 

याचबरोबर प्राथमिक आरोग्य सेवेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या वर्षा बुटे, सविता हेगडे आणि स्वाती होनमरे या तीन आशा सेविकांचा विशेष सन्मान करण्यात आला. समाजाच्या तळागाळात आरोग्यसेवा पोहोचवणाऱ्या या ‘आरोग्यदूतां’च्या कार्याबद्दल उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात कृतज्ञता व्यक्त केली. तसेच मुंबई मॅरेथॉनची ४२ किलोमीटरची आव्हानात्मक शर्यत पूर्ण करणाऱ्या धावपटूंना रोट्रॅक्ट क्लबतर्फे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रदीप टेकवडे यांनी तर प्रास्ताविक रो. किरण ओसवाल यांनी केले. अध्यक्षीय मनोगतात रो. संतोष परदेशी यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व विशद करत समाजसेवेत तरुणांचा सहभाग वाढवण्याचे आवाहन केले. रोटरी ही केवळ संस्था नसून ती सेवासंस्कृती आहे. असे त्यांनी ठामपणे नमूद केले.

 

कार्यक्रमाचा समारोप आभारप्रदर्शनाने झाला. सौ. अनिता भेगडे यांनी उपस्थित मान्यवर, सदस्य, आरोग्य कर्मचारी व आशा सेविकांचे मनःपूर्वक आभार मानले. या कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे, रोट्रॅक्टचे सर्व सदस्य, प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

एकात्मता, देशभक्ती आणि सामाजिक उत्तरदायित्वाच्या त्रिसूत्रीवर आधारित असा हा ७७ वा प्रजासत्ताक दिन सोहळा तळेगाव दाभाडेत यशस्वीपणे आणि स्मरणीय ठरला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *