शहरसामाजिक

लोहगड विसापूर विकास मंचाच्या वतीने किल्ले विसापूरावर प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहन


किल्ले विसापूरावर प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहन

 

मळवली: २६ जानेवारी

प्रजासत्ताक दिनाच्या पावन पर्वावर मावळातील ऐतिहासिक किल्ले विसापूरच्या मस्तकावर तिरंगा अभिमानाने फडकला. स्वातंत्र्य, सार्वभौमत्व आणि लोकशाही मूल्यांचे प्रतीक असलेल्या या ध्वजारोहण सोहळ्याने संपूर्ण गड परिसर देशभक्तीच्या घोषांनी आणि शिवकालीन परंपरेच्या स्मृतींनी भारावून गेला.

 

या प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन लोहगड–विसापूर विकास मंचाच्या वतीने करण्यात आले होते. मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. यावेळी ग्रामविकास अधिकारी जगन्नाथ दळवी, सहायक अधिकारी पांडुरंग वावळे, अनिकेत आंबेकर, सचिन निंबाळकर, चेतन जोशी, रोहित नगिणे आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच किल्ल्याच्या संवर्धनासाठी कार्यरत पुरातत्व विभागाचे मच्छिंद्र वाघमारे, सुभाष दिहीभाते, देविदास ढगे यांनीही उपस्थिती लावली.

 

ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित करताना सचिन टेकवडे यांनी गडकोटांचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित केले. “गडकोट टिकले तरच आपली संस्कृती टिकेल,” असे ठाम प्रतिपादन करत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांच्या शौर्याची साक्ष देणारी ही पावन भूमी जपण्याचे आवाहन केले. विसापूर किल्ला केवळ दगडमातीचा अवशेष नसून तो स्वराज्याच्या स्वप्नांचा, पराक्रमाच्या पाऊलखुणांचा आणि स्वाभिमानाच्या शिखरांचा जिवंत दस्तऐवज आहे, असे त्यांनी नमूद केले.

 

यावेळी किल्ल्याच्या सभोवतालच्या नैसर्गिक संपत्तीबाबतही गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. विसापूर परिसरातील वनसंपदा ही गडाच्या वैभवाचा अविभाज्य भाग असून ती जतन करणे ही काळाची गरज आहे, असे सांगण्यात आले. अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणीय समतोल धोक्यात येत असल्याचे निदर्शनास आणून देत, “आपले जंगल आपणच जपले पाहिजे,” असा पर्यावरण-संरक्षणाचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.

 

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने झालेला हा ध्वजारोहण सोहळा म्हणजे इतिहासपूजन, राष्ट्रनिष्ठा आणि पर्यावरण-जागर यांचा त्रिवेणी संगम ठरला. गडशिखरावर फडकणाऱ्या तिरंग्यासोबतच संवर्धनाची जाणीव आणि स्वराज्याची मूल्ये मनामनात रुजवणारा हा उपक्रम विसापूरच्या इतिहासात एक उज्ज्वल क्षण म्हणून नोंदवला गेला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *