उद्योग

मावळ–मुळशीतील धार्मिक सेवकांसाठी महासेवा शिबिरा’तून आरोग्य, संघटन आणि शासकीय लाभांचा संगम


मावळ–मुळशीतील धार्मिक सेवकांसाठी महासेवा शिबिरा’तून आरोग्य, संघटन आणि शासकीय लाभांचा संगम

कार्ला (मावळ) :
मावळ–मुळशी तालुक्यातील धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या मंदिर, बौद्ध विहार, गुरुद्वारा व जैन मंदिर व्यवस्थांमधील सेवकांसाठी एक अभिनव आणि सर्वसमावेशक उपक्रम कार्ला येथे यशस्वीपणे पार पडला. विश्व हिंदू परिषद, मंदिर एवं अर्चक पुरोहित संपर्क आयाम मावळ–मुळशी जिल्हा व श्री ट्रस्ट, कार्ला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महासेवा शिबिरा’ला विविध पंथांतील धार्मिक सेवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

माघ शुद्ध त्रयोदशी, शनिवार दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी श्री ट्रस्ट संचलित श्री दुर्ग परमेश्वरी मंदिर, कार्ला (मुंबई–पुणे जुना महामार्ग) येथे सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत हे शिबिर संपन्न झाले. तालुक्यातील विविध मंदिरांतील अर्चक, पुजारी, पुरोहित, बौद्धाचार्य, जैन पुजारी, गुरुद्वारा सेवादार, बाबाजी, मंदिर विश्वस्त व व्यवस्थापक यांचे या निमित्ताने एकत्रिकरण घडून आले.

धार्मिक सेवकांचे संघटन बळकट करणे, त्यांच्या आरोग्याची तपासणी करणे तसेच त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या शासकीय कल्याणकारी योजनांची माहिती देऊन प्रत्यक्ष नोंदणी करणे, हा या महासेवा शिबिराचा प्रमुख उद्देश होता. शिबिराचे उद्घाटन व दीपप्रज्वलन ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज मोरे देहूकर (अध्यक्ष, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहू), श्री. अजय शिराळी (प्रमुख व्यवस्थापक, श्री ट्रस्ट, कार्ला) व श्री. सुरेश साखवळकर (अध्यक्ष, बहुभाषिक ब्राह्मण संघ, मावळ) यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमात श्री. संजय मुरदाळे (मुंबई क्षेत्र धार्मिक पुंज प्रमुख) यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना धार्मिक सेवकांच्या माध्यमातून समाज व संस्कृती जागृत ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. सेवकांच्या समस्या समजून घेऊन त्यांना सामाजिक व शासकीय प्रवाहाशी जोडण्याचे कार्य हे महासेवा शिबिर प्रभावीपणे करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिबिरात सहभागी सेवकांसाठी मोफत आरोग्य तपासणीचे आयोजन MIMER मेडिकल कॉलेज, तळेगाव दाभाडे व एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, कामशेत यांच्या सहकार्याने करण्यात आले. दैनंदिन सेवेत व्यस्त असलेल्या धार्मिक सेवकांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याची महत्त्वाची संधी यामुळे मिळाली. तसेच विमा योजना, निवृत्तीवेतन, आरोग्य सुविधा आदी शासकीय लाभांची माहिती श्री. धनाजी शिंदे व श्री. समीर घरोटे यांनी दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. गोविंद ऐनापार्थी यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. माणिक गवळी यांनी मानले. स्नेहभोजनामुळे कार्यक्रमाला आपुलकीचा स्पर्श लाभला. या महासेवा शिबिराचा एकूण १२८ धार्मिक सेवकांनी लाभ घेतला, ही या उपक्रमाची उल्लेखनीय बाब ठरली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *