उद्योग

राजकारण पेशा नाही, मावळ घडवणं हीच जबाबदारी तळेगाव दाभाडेत सुनील शेळकेंचा भावनिक निर्धार


राजकारण पेशा नाही, मावळ घडवणं हीच जबाबदारी तळेगाव दाभाडेत सुनील शेळकेंचा भावनिक निर्धार

तळेगाव दाभाडे :

राजकारण हा माझा पेशा नाही. माझ्या राजकीय भविष्याची कुणी काळजी करू नये, असे ठाम आणि स्पष्ट शब्दांत सांगत आमदार सुनील शेळके यांनी मावळच्या राजकारणाला भावनिक आणि वैचारिक दिशा दिली. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या श्रद्धांजली सभेत बोलताना त्यांनी वडिलांनंतर आपल्या आयुष्यात सर्वाधिक आधार, माया आणि हट्ट पुरवणारे नेतृत्व अजितदादांचेच होते, असे भावूक मनोगत व्यक्त केले. मात्र, दादांना मी पूर्णपणे समजून घेऊ शकलो नाही, याचे आयुष्यभर दुःख राहील, असे सांगताना त्यांचे डोळे पाणावले.

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तळेगाव दाभाडे येथे आयोजित या श्रद्धांजली सभेत माजी मंत्री मदन बाफना, सहकार महर्षी माऊली दाभाडे, विठ्ठल शिंदे, गणेश खांडगे, बबनराव भेगडे, सुरेश धोत्रे, किशोर सातकर, छबुराव कडू, सुरेश चौधरी, गणेश ढोरे, संतोष राऊत, सुवर्णा राऊत, संतोष भेगडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. संपूर्ण वातावरणात स्मरण, संकल्प आणि संवेदनांचा संगम जाणवत होता.

सुनील शेळके पुढे म्हणाले, “ग्रामीण भागातील मायबाप जनता कोणता निर्णय घ्यायचा तो स्वतः घेईल. वाजत-गाजत प्रचार नको, जेवणावळी नकोत; फक्त हात जोडून लोकांसमोर उभं राहायचं.” हा विचार म्हणजे लोकशाहीच्या मुळाशी जाणारा ‘शांत प्रचारवाद’ असल्याचे राजकीय निरीक्षकांनी नमूद केले. त्यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी अजितदादांची ऊर्जावान आणि निर्णयक्षम साथ अजून किमान पंधरा ते वीस वर्षे आवश्यक होती. या आठवणींनी शेळकेंचे अश्रू अनावर झाले आणि सभास्थळी क्षणभर भावनांचा नि:शब्द ठाव बसला.

संतोष भेगडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, भेगडे परिवाराची दुसरी पिढीही पवार परिवाराशी एकनिष्ठ आहे. बारामतीनंतर राज्यात सर्वाधिक विकास मावळ तालुक्यात झाला, याचे श्रेय अजितदादांच्या विकासदृष्टीला जाते असे ते म्हणाले. माजी मंत्री मदन बाफना यांनी अजितदादांच्या कार्यशैलीवर प्रकाश टाकताना सांगितले की, सकाळी सात वाजल्यापासून ते कामासाठी सज्ज असायचे. त्यांची ऊर्जा, वेग आणि निर्णयक्षमता मी जवळून पाहिली आहे.

गणेश खांडगे यांनी भावनिक शब्दांत सांगितले, आम्ही अजितदादांमध्ये देव पाहिला. त्यांना रडणारा नव्हे, तर लढणारा कार्यकर्ता हवा होता.” त्यामुळे त्यांच्या स्मृतींना विजय अर्पण करण्याचा निर्धार प्रत्येकाने करावा, असे आवाहन त्यांनी केले. बबनराव भेगडे यांनी तळेगाव स्टेशनचा पाणीपुरवठा आणि कोडींवडेचा पूल ही अजितदादांच्या कार्याची ठोस साक्ष असल्याचे नमूद केले. तर वडगाव मावळ येथे अजित पवार यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा, अशी मागणी सुरेश चौधरी यांनी केली.

ही सभा केवळ श्रद्धांजली नव्हती, तर ‘स्वप्नातील मावळ’ उभारण्याचा सामूहिक संकल्प होता. उरलेल्या साडेतीन वर्षांत अजितदादांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार सुनील शेळकेंनी जाहीर केला आणि मावळच्या राजकारणात नव्या आशेचा दीप प्रज्वलित झाला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *