ताज्या घडामोडी

जपान ते दुबई पर्यंत मावळच्या गुलाबांचा सुगंध


जपान ते दुबई पर्यंत मावळच्या गुलाबांचा सुगंध

 

 

मावळ:

प्रेम, आपुलकी आणि भावना व्यक्त करण्याचं सर्वात सुंदर प्रतीक म्हणजे गुलाब. १४ फेब्रुवारीचा ‘व्हॅलेंटाइन डे’ जवळ येताच यंदा गुलाबांच्या फुलांना मोठी मागणी निर्माण झाली आहे. या वाढत्या मागणीचा थेट लाभ मावळ तालुक्यातील फूलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळत असून, मावळच्या गुलाबांनी थेट जागतिक बाजारपेठेत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

 

यंदा अनुकूल हवामान, योग्य तापमान आणि वेळेवर मिळालेल्या पाण्यामुळे गुलाबांचे उत्पादन दर्जेदार झाले आहे. फुलांचा आकार, रंगसंगती आणि टिकाऊपणा उत्कृष्ट असल्याने देशांतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही मावळच्या गुलाबांना मोठी मागणी आहे. परिणामी शेतकरी वर्गात समाधान आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातून यंदा सुमारे ४० ते ४५ लाख गुलाबांची फुले थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात होणार आहेत. यामध्ये जपान, ऑस्ट्रेलिया, अरब देश, हॉलंड, ग्रीस, स्वीडन, युरोपमधील विविध देश तसेच दुबईच्या बाजारपेठांचा समावेश आहे. परदेशी बाजारपेठेत मावळच्या गुलाबांची मागणी सातत्याने वाढत असल्याने निर्यातीच्या संधीही विस्तारल्या आहेत.

 

देशांतर्गत बाजारपेठेतही मावळच्या गुलाबांना मोठी पसंती मिळत आहे. मुंबई, दिल्ली, बंगळुरू आणि कोलकाता यांसारख्या महानगरांमध्ये बुके, सजावट आणि कार्यक्रमांसाठी मोठ्या प्रमाणावर गुलाबांची मागणी आहे. स्थानिक बाजारपेठेत सुमारे ५५ ते ६० लाख गुलाबांची विक्री होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

रंगांच्या बाबतीत लाल गुलाबांना प्रेमाचं प्रतीक मानलं जात असल्याने सर्वाधिक मागणी आहे. त्याचबरोबर गुलाबी, पांढरे आणि पिवळ्या रंगांचे गुलाबही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. खास बुके, स्टेज डेकोरेशन, हॉटेल्स, मॉल्स आणि कार्यक्रमांसाठी या रंगांच्या फुलांची मोठ्या प्रमाणावर खरेदी होत आहे.

 

व्हॅलेंटाइन डेच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त उत्पादन आणि दर्जा राखण्यासाठी शेतकरी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून गुलाबाच्या झाडांचे कटिंग आणि बेंडिंग करत आहेत. दिवस-रात्र मेहनत घेऊन फुलांची निगा राखली जात असून, योग्य वेळी काढणी करून ती थेट बाजारपेठेत पाठवली जात आहेत.

 

याबाबत प्रगतशील फुल उत्पादक सिद्धार्थ शिवाजी भेगडे म्हणाले, यंदा हवामान आमच्या बाजूने राहिलं. त्यामुळे फुलांची गुणवत्ता खूपच चांगली आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध झाल्यामुळे उत्पादनाला योग्य दर मिळत असून नफ्यात वाढ झाली आहे.

 

एकूणच, प्रेमाच्या गुलाबांनी मावळ तालुक्याला जागतिक नकाशावर नेलं असून, शेतकऱ्यांच्या मेहनतीला यंदा सुवर्णफळ मिळत असल्याचं चित्र दिसत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *