तळेगाव दाभाडेचा आठवडी बाजार की मोबाईल चोरीचे मार्केट? नागरिकांना मोबाईल सांभाळण्याचे आवाहन
तळेगाव दाभाडेचा आठवडी बाजार की मोबाईल चोरीचे मार्केट? नागरिकांना मोबाईल सांभाळण्याचे आवाहन
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे येथील रविवारचा आठवडी बाजार हा परिसरातील नागरिकांसाठी खरेदीचे महत्त्वाचे ठिकाण मानला जाते . मात्र अलीकडच्या काळात या बाजारात मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची तक्रार अनेक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हा आठवडी बाजार आता मोबाईल चोरट्यांसाठी पोषक ठरत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.
रविवारच्या दिवशी बाजारात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. भाजीपाला, फळे, कपडे तसेच विविध घरगुती वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने येथे येतात. गर्दीचा फायदा घेत काही चोरटे नागरिकांच्या खिशातील किंवा पिशव्यांमधील मोबाईल लंपास करत असल्याचे प्रकार समोर येत आहेत.
अनेक नागरिकांनी सांगितले की, बाजारात खरेदी करत असताना त्यांच्या मोबाईल चोरीस गेल्याच्या घटना घडल्या आहेत. काहींनी मोबाईल चोरांना पकडण्याचा प्रयत्न केला असता, चोरटे गर्दीत मिसळून पळून जात असल्याचेही सांगितले. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे रविवारच्या आठवडी बाजारात पोलीस गस्त फारशी दिसून येत नसल्याचेही नागरिकांनी सांगितले. नियमित पोलीस गस्त नसल्यामुळे चोरट्यांचे मनोबल वाढत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. बाजार परिसरात पोलीसांची उपस्थिती वाढवावी, अशी मागणीही स्थानिकांनी केली आहे.
दरम्यान, नागरिकांनी बाजारात खरेदी करताना आपले मोबाईल आणि मौल्यवान वस्तू काळजीपूर्वक सांभाळाव्यात, असे आवाहन करण्यात येत आहे. गर्दीच्या ठिकाणी मोबाईल सुरक्षित ठिकाणी ठेवणे, अनोळखी व्यक्तींवर लक्ष ठेवणे आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देणे आवश्यक असल्याचेही सांगितले जात आहे.
तळेगाव दाभाडे येथील आठवडी बाजार सुरक्षित राहण्यासाठी पोलीस प्रशासनानेही गस्त वाढवून आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.





