ताज्या घडामोडीमहत्त्वाचेसामाजिक

साप्ताहिक अंबरचा ३६वा वर्धापन दिन : समाजरत्नांचा गौरवसोहळा तळेगावात रंगणार


साप्ताहिक अंबरचा ३६वा वर्धापन दिन : समाजरत्नांचा गौरवसोहळा तळेगावात रंगणार

 

 

 

तळेगाव दाभाडे : विधायक पत्रकारितेचा ध्यास घेत मावळ तालुक्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेले साप्ताहिक अंबर यंदा आपल्या ३६व्या वर्धापन दिनाच्या उंबरठ्यावर उभे आहे. समाजमनाला दिशा देणाऱ्या या वृत्तपरंपरेचा सोहळा यंदा अधिक भव्य, अधिक प्रेरणादायी ठरणार असून १३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता तळेगाव दाभाडे येथील हॉटेल ईशा येथे उत्साहात पार पडणार आहे.

 

साप्ताहिक अंबरच्या या सोहळ्याला केवळ वर्धापन दिनाची औपचारिकता नसून, समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारा सन्मान महोत्सव असेच स्वरूप लाभले आहे. यावर्षीच्या सोहळ्याचे अध्यक्षस्थान लायन्स क्लबच्या माध्यमातून महाराष्ट्रभर भव्य समाजसेवेचे जाळे उभे करणारे तसेच प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर डॉ. दीपक शहा भूषवणार आहेत.

 

या वर्षीच्या कार्यक्रमात जीवनगौरव पुरस्कार हा सन्मान विशेष आकर्षण ठरणार आहे. उद्योग, समाजकार्य आणि बांधकाम क्षेत्रातील भक्कम पायाभरणी करणारे ज्येष्ठ उद्योजक शंकरराव शेळके, नावीन्यपूर्ण वास्तुरचनेतून समाजाभिमुख कार्य करणारे आर्किटेक्ट गोरखभाऊ काळोखे आणि वास्तुरचना डेव्हलपर्सचे डायरेक्टर चंद्रकांत भिडे या त्रयीला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

 

समाजाच्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्तृत्ववान व्यक्तींचाही या मंचावर गौरव होणार आहे. शिवराज ग्रुपचे संस्थापक अतुल वायकर यांना सामाजिक बांधिलकी जपत व्यवसायातून समाजसेवा केल्याबद्दल पुरस्कार प्रदान होईल. नेत्ररुग्ण सेवेतील उल्लेखनीय योगदानासाठी पार्वती नेत्रालयाचे संचालक डॉ. अशोक दाते यांचा देखील सन्मान होणार आहे. प्रबोधनपर व्याख्यानांमधून सामाजिक जागृती घडवणारे प्रा. विवेक गुरुव यांना सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरवण्यात येईल.

 

कला क्षेत्रात आपल्या नृत्यसाधनेतून सांस्कृतिक परंपरेला नवे आयाम देणाऱ्या अर्चना जावळेकर यांचा देखील सन्मान होणार आहे. तर समाजसेवेच्या कार्यात निःस्वार्थ योगदान देणारे सुहास (राजाभाऊ) नाखरे यांनाही गौरविण्यात येणार आहे. क्रीडा क्षेत्रात भारताचा झेंडा उंचावणारी, शेकडो पदकांची मानकरी आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावणारी क्रीडा अधिकारी हर्षदा गरूड हिचा सुध्दा सन्मान कार्यक्रमात होईल.

 

यंदाच्या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बालवयातच दुर्गभ्रमंतीचा विक्रम गाठणारा आणि १४० गडकिल्ल्यांची पदभ्रमंती पूर्ण करणारा बालव्याख्याता कु. रुद्रप्राताप बोराडे याचा प्रेरणादायी गौरव होणार आहे. या सर्व मान्यवरांचा सत्कार हा समाजातील सकारात्मक ऊर्जा वृद्धिंगत करणारा ठरेल, अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे.

 

साप्ताहिक अंबरने गेल्या तीन दशकांत केवळ बातम्यांचे माध्यम न राहता, समाजजागृतीचे व्यासपीठ म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या प्रवासातील प्रत्येक टप्पा हा वाचकांच्या विश्वासाने समृद्ध झाला आहे. त्यामुळेच वर्धापन दिन सोहळा हा वाचक आणि स्नेही यांच्यासाठीही उत्सवाचा क्षण ठरणार आहे.

 

या सोहळ्यास अंबरचे वाचक, स्नेहीवर्ग आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन संपादक, सहसंपादक आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *