सामाजिक

शिवशंभू स्मारकाला अर्थसंकल्पी ‘संजीवनी द्या उत्सवांसाठी स्वतंत्र तरतुदीची मागणी


शिवशंभू स्मारकाला अर्थसंकल्पी ‘संजीवनी द्या उत्सवांसाठी स्वतंत्र तरतुदीची मागणी

तळेगाव दाभाडे:
तळेगावच्या ऐतिहासिक वैभवाला अधोरेखित करणाऱ्या श्री छत्रपती शिवशंभू स्मारकासाठी नगर परिषदेकडून अर्थसंकल्पात स्वतंत्र निधीची तरतूद करावी, अशी ठाम मागणी श्री शिवशंभू स्मारक संस्थेने केली आहे. स्मारक परिसर ‘उत्सवसंजीवित’ आणि ‘संस्कृतीसंपन्न’ ठेवण्यासाठी वार्षिक नियोजनबद्ध आर्थिक पाठबळ अत्यावश्यक असल्याचे संस्थेने नमूद केले.

ऑक्टोबर २०२५ मध्ये लोकार्पण झालेल्या या स्मारकाने अल्पावधीतच इतिहासदर्शनाचे प्रेरणाकेंद्र म्हणून ओळख निर्माण केली आहे. मात्र देखभाल, स्वच्छता, प्रकाशयोजना, सुरक्षा आणि परिसरविकास यांसाठी नियमित निधीअभावी अनेक उपक्रमांना मर्यादा येत असल्याची खंत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

या संदर्भात संस्थेच्या शिष्टमंडळाने नगर परिषदेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. शिवजयंती, शिवराज्याभिषेक दिन, विविध महापुरुषांच्या जयंती-उत्सव, व्याख्यानमाला, शैक्षणिक शिबिरे, सांस्कृतिक महोत्सव अशा वर्षभर चालणाऱ्या कार्यक्रमांची ‘उत्सवसाखळी’ स्मारकात राबविण्याचा मानस आहे. मात्र निधीअभावी नियोजनावर बंधने येतात. नगर परिषदेकडून स्वतंत्र अर्थसंकल्पीय तरतूद झाल्यास स्मारक परिसर अधिक दर्जेदार आणि लोकाभिमुख करता येईल असे संस्थेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

स्मारक केवळ दगडी रचना नसून ते स्वराज्यसंस्कारांचे प्रेरणास्थान आहे. विद्यार्थ्यांसाठी इतिहासदर्शन उपक्रम, देशभक्तीपर स्पर्धा, अभ्यासदौरे आणि नागरिकांसाठी सांस्कृतिक संमेलने आयोजित करण्याची रूपरेषा संस्थेने निवेदनात मांडली. यासाठी वार्षिक देखभाल निधी, उत्सव खर्च आणि विकासकामांसाठी स्वतंत्र शिवशंभू विकासनिधी निर्माण करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मुख्याधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून विषय सकारात्मकरीत्या विचारात घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती संस्थेने दिली. नगर परिषदेच्या आगामी अर्थसंकल्पात याबाबत ठोस निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

यावेळी संस्थेचे विश्वस्त व माजी नगराध्यक्ष रवींद्रनाथ दाभाडे, माजी नगरसेवक सुरेश दाभाडे, संदीप जगनाडे तसेच कोषाध्यक्ष संजय बाविस्कर उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *