क्राईम

तळेगाव एमआयडीसी पोलिसांची बधलवाडीत कारवाई; ५८९ ग्रॅम गांजासह दुचाकी जप्त: ५९ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत; एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल


तळेगाव एमआयडीसी पोलिसांची बधलवाडीत कारवाई; ५८९ ग्रॅम गांजासह दुचाकी जप्त:

५९ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत; एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल

 

 

तळेगाव दाभाडे : तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बधलवाडी येथे गांजा बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ५८९ ग्रॅम वजनाचा गांजा आणि एक दुचाकी असा एकूण ५९ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सलमान मैनुद्दीन शेख (वय २७, सध्या रा. नवलाख उंब्रे, ता. मावळ; मूळ रा. भिवंडी, जि. ठाणे) याच्याविरुद्ध अमली पदार्थ व मनःप्रभावी पदार्थ कायद्यानुसार (एनडीपीएस) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार (दि. २६ ऑक्टोबर) रोजी सायंकाळी सुमारे ४.३५ वाजता बधलवाडी गावच्या हद्दीत बी.ओ.पी. कंपनीलगत असलेल्या मोकळ्या जागेत ही कारवाई करण्यात आली. संबंधित व्यक्तीच्या ताब्यात विक्रीच्या उद्देशाने गांजा बाळगल्याचे आढळून आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

 

या कारवाईत २९ हजार ४५० रुपये किमतीचा, ५८९ ग्रॅम वजनाचा हिरवट-तपकिरी रंगाचा ओलसर गांजा जप्त करण्यात आला. तसेच ३० हजार रुपये किमतीची हिरो होंडा कंपनीची लाल रंगाची सीडी डिलक्स दुचाकी (क्रमांक एमएच १४ बीजी ०५२४) ताब्यात घेण्यात आली. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ५९ हजार ४५० रुपये आहे.

 

या प्रकरणी पोलीस कर्मचारी रोहित तानाजी माने यांनी फिर्याद दिली. त्यानुसार तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५१/२०२६ अन्वये एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क) आणि २०(ब)(ii)(अ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड व बसवराज तेली, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत मोहिते, पोलीस उपनिरीक्षक दीपक खरात, विशाल नवघिरे, सहायक पोलीस फौजदार अनंत रावण, पोलीस हवालदार प्रशांत निळे, पोलीस कर्मचारी गणेश दरंदले, रोहित माने, विनायक शेरमाळे आणि भीमराव खिलारे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

 

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक खरात करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *