आरोग्य

उन्हाची चाहूल.तळेगावात रसवंतीगृहांवर तहानलेल्या नागरिकांची गर्दी


उन्हाची चाहूल.तळेगावात रसवंतीगृहांवर तहानलेल्या नागरिकांची गर्दी

 

तळेगाव दाभाडे: फेब्रुवारी अखेरपासून उन्हाची तीव्रता चढू लागल्याने शहरातील रसवंतीगृहे, सरबत केंद्रे आणि थंड पेयांच्या गाड्यांवर ग्राहकांची लगबग वाढली आहे. दुपारच्या तळपत्या उन्हात उसाचा गोड रस, ताजेतवाने लिंबूपाणी, थंडगार ताक व कोकम सरबत यांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्याचबरोबर नारळपाणी, कलिंगड यांसारख्या पाण्याने परिपूर्ण फळांची विक्रीही वेग घेताना दिसत आहे.

शाळा-महाविद्यालये सुटल्यानंतर विद्यार्थीवर्ग तसेच कामगार वर्ग तहान शमवण्यासाठी या ठिकाणी गर्दी करत असल्याचे चित्र आहे. अनेक विक्रेते स्वच्छतेचे निकष पाळत शुद्ध पाणी व स्वच्छ बर्फ वापरण्यावर भर देत आहेत. काही ठिकाणी उकळून थंड केलेले पाणी वापरण्याचीही खबरदारी घेतली जात आहे.

उन्हाळ्यात शरीरातील द्रवपदार्थांची कमतरता टाळण्यासाठी घरगुती सरबत, ताक किंवा स्वच्छ पाणी यांना प्राधान्य द्यावे, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे. बाहेरील पेयांचा आस्वाद घेताना पाण्याचा दर्जा, बर्फाची गुणवत्ता आणि स्वच्छता तपासणे आवश्यक आहे.

स्थानिक विक्रेते नवनाथ (भाऊ) वाजे म्हणाले, कि उन्हाची तीव्रता वाढताच ग्राहकांची संख्या वाढली आहे. आम्ही दर्जेदार आणि स्वच्छ पेय देण्यावर भर देत आहोत. उन्हाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याची काळजी घेत थंड पेयांचा आनंद घेण्याची गरज अधोरेखित होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *