शिक्षितांचा निर्लज्जपणा तळेगाव दाभाडेतील नाना भालेराव कॉलनी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात
शिक्षितांचा निर्लज्जपणा तळेगाव दाभाडेतील नाना भालेराव कॉलनी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात
तळेगाव दाभाडे:
स्वच्छतेच्या गप्पा मारणारे आणि स्वतःला सुशिक्षित म्हणवणारे नागरिकच जर रस्त्यावर कचरा टाकून परिसराचे अक्षरशः कचराकुंडीत रूपांतर करत असतील, तर याला काय म्हणायचे? स्टेशन परिसरातील नाना भालेराव कॉलनीमध्ये सध्या हाच संतापजनक प्रकार उघडपणे सुरू असून प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे परिस्थिती हाताबाहेर जात आहे.
दररोज रस्त्याच्या कडेला बिनधास्त कचरा टाकणाऱ्या नागरिकांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून भटकी कुत्री हा कचरा संपूर्ण कॉलनीभर पसरवत आहेत. परिणामी, संसर्गजन्य आजारांचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. पण याची कोणालाही पर्वा नसल्याचे चित्र आहे.
धक्कादायक म्हणजे, हा प्रकार अडाणी लोकांकडून नव्हे तर उच्च शिक्षित, वैद्यकीय शिक्षण घेणारे आणि स्वतःला सुसंस्कृत समजणाऱ्या नागरिकांकडूनच घडत आहे. शिक्षण घेतलंय की फक्त पदव्या घेतल्या? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.
कॉलनीत दररोज घंटागाडी येत असतानाही जाणीवपूर्वक कचरा रस्त्यावर फेकला जात आहे. म्हणजेच हा केवळ निष्काळजीपणा नसून सरळसरळ बेफिकिरी आणि बेजबाबदारी आहे. आम्ही नाही सुधारणार, तुम्ही कितीही सांगा,अशी उघड बंडखोरी करणाऱ्या या मानसिकतेमुळे संपूर्ण परिसर त्रस्त झाला आहे.
नगरसेविका डॉ ऋतुजा भगत यांनी या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसवला आहे. तसेच येथे कचरा टाकू नये अशी मोठी होर्डिंग लावली आहे. तरीही रोज त्याच ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचत आहेत. यावरून नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याचे स्पष्ट दिसते.
नगरपरिषद मात्र डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. कारवाई शून्य, फक्त दिखावा, अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. दंडात्मक कारवाईचा पूर्ण अभाव असल्याने कचरा टाकणाऱ्यांचे फावले आहे.
आता तरी प्रशासन जागे होणार का? संबंधित ठिकाणी तातडीने क्लीन मार्शल नेमून कडक दंडात्मक कारवाई केली नाही, तर हा कचऱ्याचा विळखा नागरिकांच्या आरोग्यावर थेट घाला घालणार, हे निश्चित!





