गावभागातील दोन्ही ऐतिहासिक तलावांकडे नगराध्यक्ष संतोष दाभाडे लक्ष देतील का?
गावभागातील दोन्ही ऐतिहासिक तलावांकडे नगराध्यक्ष संतोष दाभाडे लक्ष देतील का?
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे शहराच्या वैभवात मोलाची भर घालणारे गावभागातील दोन्ही ऐतिहासिक तलाव सध्या जलपर्णी, कचरा व प्रदूषणाच्या विळख्यात सापडले असून पर्यावरणीय समतोलाला मोठा धोका निर्माण झाला आहे. एकेकाळी निसर्गसंपन्नतेची ओळख असलेले हे तलाव आज प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अक्षरशः आजारी अवस्थेत पोहोचले आहेत.
तलावांवर दाट पसरलेली जलपर्णी, पाण्यात साचलेला कचरा, पूजेचे निर्माल्य व सांडपाण्यामुळे जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परिणामी जलचर प्राणी, मासे व स्थलांतरित पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले असून दुर्गंधी व डासांच्या प्रादुर्भावाने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
काही महिन्यांपूर्वी तळेगाव दाभाडे नगर परिषदेने लाखो रुपयांचा खर्च करून तलाव स्वच्छता मोहीम हाती घेतली होती. मोठ्या यंत्रसामग्रीच्या सहाय्याने जलपर्णी काढण्यात आली होती. मात्र, स्वच्छतेनंतर योग्य देखभाल, नियमित नियोजन आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अभाव असल्याने अवघ्या काही काळातच परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ झाली आहे. त्यामुळे केलेला खर्च पाण्यात गेला, अशी तीव्र भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
विशेष म्हणजे तलाव परिसरात निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र कुंड, सूचना फलक अथवा जनजागृती व्यवस्था नसल्याने नागरिकांकडून थेट तलावातच फुले, हार, नारळ व पूजेचे साहित्य टाकले जात आहे. परिसरातील सांडपाणी तलावात सोडले जात आहे यामुळे पाण्याची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत चालली आहे. ऐतिहासिक बनेश्वर मंदिरासमोरील तलावात दरवर्षी प्रदूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडत असल्याच्या घटना घडत असून हा गंभीर इशारा मानला जात आहे.
या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष संतोष दाभाडे हे यापूर्वी ‘निर्मल वारी’ अभियानाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचा प्रदीर्घ अनुभव असलेले नगराध्यक्ष गावभागातील या दोन्ही ऐतिहासिक तलावांकडे लक्ष देतील का, असा सवाल आता नागरिक विचारत आहेत. ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत जलपर्णी निर्मूलन, कायमस्वरूपी स्वच्छता यंत्रणा, निर्माल्य संकलन कुंडांची उभारणी व व्यापक जनजागृती मोहिम राबवावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी व नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
- तळेगावच्या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस व दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.





