आरोग्यशहर

नववर्षाची आरोग्यदायी सुरुवात : गोल्डन रनिंग क्लबतर्फे ‘फॅमिली रन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद


नववर्षाची आरोग्यदायी सुरुवात : गोल्डन रनिंग क्लबतर्फे ‘फॅमिली रन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

तळेगाव दाभाडे :
नववर्षाची सुरुवात आरोग्य, कुटुंब आणि सकारात्मकतेच्या संकल्पनेने व्हावी, या उद्देशाने तळेगाव दाभाडे येथील गोल्डन रनिंग क्लब (GRC) यांच्या वतीने १ जानेवारी रोजी ‘फॅमिली रन’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. गोल्डन रनिंग क्लबचा हा उपक्रम समाजात आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणारा ठरला.

लहान मुलांचा धावण्याकडे कल वाढावा, पालकांनी स्वतः उदाहरण घालून मुलांना प्रेरणा द्यावी तसेच संपूर्ण कुटुंबाने एकत्रितपणे आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारावी, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू होता. सध्याच्या डिजिटल युगात मोबाईल, टीव्ही आणि स्क्रीनवर वाढलेले अवलंबित्व लक्षात घेता, मुलांना मैदानी खेळ व व्यायामाकडे वळवण्याचा हा स्तुत्य प्रयत्न असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

सकाळी ६.१५ वाजता आयोजित करण्यात आलेल्या या फॅमिली रनमध्ये २२ मुलांनी आपल्या पालकांसह सहभाग नोंदवला, तर एकूण ५० हून अधिक धावक या उपक्रमात सहभागी झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात GRC चे सचिव मंगेश मरवाडी यांनी घेतलेल्या स्ट्रेचिंग सत्राने झाली. त्यानंतर धावण्याचा झेंडा गोल्डन रोटरी क्लब, तळेगावचे अध्यक्ष संतोष शांताराम परदेशी, महाराष्ट्राची ‘स्ट्राँग वुमन’ कु. सेजल मोईकर (वय १८) आणि GRC चे अध्यक्ष विशाल खळदे यांच्या हस्ते दाखवण्यात आला.

प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या कु. सेजल मोईकर यांनी आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनातून नियमित व्यायाम, शिस्त आणि सातत्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या उपस्थितीमुळे मुलांमध्ये आणि धावकांमध्ये विशेष उत्साह संचारला.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी दीपक फल्ले, प्रदीप मुंगसे, सुजाता देव, अमोल हिंगे, प्रशांत ताये, अविनाश कुरणे, हेमंत गुजर, सुरज जाट, बाळू चव्हाण यांच्यासह गोल्डन रनिंग क्लबच्या सर्व सदस्यांनी मोलाचे योगदान दिले.

कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्ष विशाल खळदे यांनी सर्व धावक, पालक, मुले, पाहुणे व आयोजकांचे आभार मानत नववर्षात आरोग्यदायी आणि सक्रिय जीवनशैली स्वीकारण्याचा संदेश दिला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *