क्राईम

तळेगाव दाभाडे डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई ७ लाख १२ हजार रुपयांचा एमडी ड्रग्स जप्त. दोघांना अटक


तळेगाव दाभाडे डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई
७ लाख १२ हजार रुपयांचा एमडी ड्रग्स जप्त. दोघांना अटक

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन अंतर्गत डिटेक्शन ब्रांच (डीबी) पथकाने प्रभावी कारवाई करत तब्बल ७ लाख १२ हजार रुपयांचा अमली पदार्थ जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर ड्रग्स विक्रीला मोठा आळा बसला असून पोलिसांच्या दक्षतेचे कौतुक होत आहे.

दि. १ मार्च रोजी एमएससीबीजवळील तळ्याच्या परिसरात डीबी पथकाला गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून संशयितांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी इलाही अकबर शेख (वय ३७, रा. पवना नगर, थेरगाव) व रफिक करीम मुजावर (वय ४३, रा. वाल्हेकर वाडी, चिंचवड) यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून ११ ग्रॅम २१ मिलिग्रॅम मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ तसेच इतर साहित्य असा एकूण अंदाजे ७,१२,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संबंधित आरोपी संगनमताने अमली पदार्थ विक्रीसाठी जवळ बाळगत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. डीबी पथकाचे उपपोलीस निरीक्षक मुकेश मोहरे, पोलीस हवालदार अजय सरजीने, संतोष जाधव तसेच पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण मुठे, प्रकाश जाधव, आनंद मोहिते आणि किरण मदने यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.

पोलिसांनी आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या धाडसी कारवाईमुळे तळेगाव दाभाडे परिसरातील अमली पदार्थांच्या वाढत्या व्यापारावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यास मदत होणार आहे.

स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या तत्परतेचे स्वागत केले असून अशा कारवाया सातत्याने राबवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *