पवित्र देहू नगरीत गांजा विक्री करणाऱ्यास अटक.देहूरोड पोलिसांची इंद्रायणी पुलाजवळ कारवाई. ५९७ ग्रॅम गांजा जप्त
पवित्र देहू नगरीत गांजा विक्री करणाऱ्यास अटक.देहूरोड पोलिसांची इंद्रायणी पुलाजवळ कारवाई. ५९७ ग्रॅम गांजा जप्त
देहू: संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देहू नगरीत अमली पदार्थ विक्रीचा प्रकार उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. देहूरोड पोलीस ठाणे यांच्या पथकाने शनिवारी (१४ फेब्रुवारी) सायंकाळी येलवाडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर इंद्रायणी नदीचा पूल परिसरात कारवाई करत गांजा विक्री करणाऱ्या इसमाला अटक केली.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल किरण खेडकर यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी अंकुश अनंत गाडे (वय ५१, रा. मराठी शाळेमागे, येलवाडी, ता. खेड, जि. पुणे) याला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अंकुश गाडे हा इंद्रायणी नदीच्या पुलाजवळ संशयास्पदरीत्या थांबलेला आढळून आला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून २९ हजार ८५० रुपये किमतीचा ५९७ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. संबंधित अमली पदार्थ त्याने बेकायदेशीररित्या स्वतःच्या ताब्यात ठेवला होता. जप्त केलेला मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला असून आरोपीविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, संत तुकाराम महाराजांच्या पवित्र देहू नगरीत अशा प्रकारे अमली पदार्थांची विक्री होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. धार्मिक व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या ठिकाणी तरुण पिढी अमली पदार्थांच्या आहारी जात असल्याची चिंता स्थानिकांनी व्यक्त केली आहे. विशेषतः देहू व परिसरातील अनेक तरुण तसेच अल्पवयीन मुले व्यसनाच्या विळख्यात सापडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
पोलिसांनी परिसरात गस्त वाढविण्यात येणार असल्याचे सांगितले असून, नागरिकांनीही संशयास्पद हालचालींबाबत त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पुढील तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.





