वडगाव मावळ गांजा विक्रीचे हॉटस्पॉट पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
वडगाव मावळ गांजा विक्रीचे हॉटस्पॉट पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
वडगाव मावळ : शहरात गांजा विक्रीचे प्रमाण वाढत असून वडगाव मावळ हे ठिकाण सध्या गांजा विक्रीचे हॉटस्पॉट ठरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलांपासून ते सत्तर वर्षांच्या ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत विविध वयोगटातील नागरिक या विळख्यात अडकले असल्याचे चित्र आहे. पानटपऱ्यांच्या माध्यमातून उघडपणे गांजाची विक्री सुरू असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
वडगाव मावळसह तळेगाव शहरातील अनेक व्यसनाधीन व्यक्ती गांजा खरेदीसाठी वडगावमध्ये येत असल्याचे सांगितले जाते. दिवसभर संशयास्पद हालचाली सुरू असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गांजाच्या नशेत वाहन चालविणाऱ्या काही व्यक्तींचे अपघात झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे वाहतूक सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पालकांमध्ये विशेषतः चिंतेचे वातावरण असून शालेय व महाविद्यालयीन युवक या व्यसनाच्या आहारी जात असल्याची खंत व्यक्त होत आहे. मुलांच्या भवितव्याशी खेळ सुरू आहे, मात्र संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करत आहे, अशी भावना एका पालकाने व्यक्त केली.
दरम्यान, पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. एका जेष्ठ व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर येथे सर्व काही उघडपणे सुरू आहे. कारवाई होत नाही. काहींना हप्ता दिला जातो, असा गंभीर आरोप केला. मात्र या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
या प्रकरणी पोलिस प्रशासनाने तातडीने लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा वडगाव मावळ हे व्यसनाचे केंद्र बनण्याची भीती व्यक्त केली जात आहे.





