आरोग्यताज्या घडामोडीशहरसामाजिक

मावळ दर्पणच्या बातमीचा परिणाम तळेगावात अखेर धूरफवारणी: संजय मांढरे यांनी स्वखर्चाने उचलली जबाबदारी


मावळ दर्पणच्या बातमीचा परिणाम तळेगावात अखेर धूरफवारणी: संजय मांढरे यांनी स्वखर्चाने उचलली जबाबदारी

 

तळेगाव दाभाडे :

शहरातील वाढत्या डासदंशाच्या समस्येकडे लक्ष वेधणाऱ्या मावळ दर्पणच्या वृत्ताचा अखेर परिणाम दिसून आला असून घोरावाडी स्टेशन .कुंभार वाडा .भेगडे आळी .रमाकांत नगर .भागांत धूरफवारणी करण्यात आली आहे. ७ मार्च रोजी डासदंशाचा विळखा तळेगावातील नागरिकांची धूरफवारणीसाठी नगरपरिषदेकडे मागणी या आशयाचे वृत्त मावळ दर्पणमध्ये प्रसिद्ध झाले होते. या वृत्तानंतर प्रशासनाने घोरावडी रेल्वे स्टेशन परिसरासह विविध भागांत धूरफवारणीची कार्यवाही केली .

 

तळेगाव दाभाडे शहरातील घोरावडी रेल्वे स्टेशन परिसर, कुंभारवाडा, भेगडे आळी, निळकंठ नगर तसेच भोई आळी या भागांत मागील काही दिवसांपासून डासांचा प्रचंड प्रादुर्भाव वाढला होता. वाढत्या उकाड्यामुळे, साचलेले पाणी, उघडी गटारे आणि अस्वच्छतेमुळे डासांची उत्पत्ती झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांमध्ये डेंगू, मलेरिया आणि हत्तीरोगासारख्या आजारांची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे नागरिकांनी नगरपरिषदेकडे तातडीने धूरफवारणी व औषध फवारणी करण्याची मागणी केली होती.

 

मावळ दर्पणने हा प्रश्न अधोरेखित करताच प्रशासनाचे लक्ष वेधले गेले. त्यानंतर स्थानिक कार्यकर्ते संजय मांढरे यांनी पुढाकार घेत संबंधित भागांत धूरफवारणीची मोहीम राबवली. विशेष म्हणजे नगरपरिषदेकडून अद्याप औषध फवारणी व धूरफवारणीचे टेंडर निघाले नसतानाही त्यांनी हे काम स्वखर्चाने केल्याचे सांगितले.

 

या संदर्भात बोलताना संजय मांढरे म्हणाले, परिसरातील नागरिकांना डासांच्या प्रादुर्भावामुळे मोठा त्रास सहन करावा लागत होता. नगरपरिषदेकडून टेंडर प्रक्रिया सुरू नसतानाही नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून आम्ही स्वतःच्या खर्चातून धूरफवारणी करण्याचा निर्णय घेतला.

 

दरम्यान, घोरावडी रेल्वे स्टेशन परिसरातील गटारांमध्ये साचलेले पाणी, दुर्लक्षित स्वच्छता व्यवस्था आणि उघडी गटारे यामुळे डासांचे उत्पत्तीस्थान तयार झाले आहे. त्यामुळे केवळ धूरफवारणीपुरते मर्यादित न राहता स्वच्छता मोहीम राबविणे, साचलेले पाणी हटविणे आणि नागरिकांमध्ये आरोग्य जनजागृती करणे आवश्यक असल्याची मागणीही स्थानिकांकडून होत आहे.

 

संजय मांढरे यांनी स्वखर्चाने केलेल्या या कामाचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले असून प्रशासनानेही आता नियमित फवारणी व स्वच्छतेकडे लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *