जागतिक युद्धाचा ग्रामीण स्वयंपाकघरावर परिणाम : मावळमध्ये गॅस सिलेंडरची टंचाई, नागरिकांची धावपळ
जागतिक युद्धाचा ग्रामीण स्वयंपाकघरावर परिणाम : मावळमध्ये गॅस सिलेंडरची टंचाई, नागरिकांची धावपळ
मावळ :
मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अमेरिका–इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर त्याचे परिणाम आता महाराष्ट्रातील ग्रामीण भागातही जाणवू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेल्या तणावामुळे इंधन व नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यावर परिणाम होत असल्याची चर्चा असून त्याचा थेट परिणाम देशांतर्गत बाजारपेठेवर दिसून येत आहे. परिणामी पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांच्या अर्थकारणावर मोठा ताण निर्माण झाला आहे.
मावळ तालुक्यातील वडगाव मावळ, तळेगाव तसेच आसपासच्या ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण झाली आहे. गॅस सिलेंडरचा पुरवठा अपुरा असल्याने नागरिकांना सिलेंडर मिळवण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे. अनेक ठिकाणी गॅस एजन्सीसमोर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
दरम्यान, काही ठिकाणी नागरिक पहाटेपासूनच गॅस एजन्सीच्या कार्यालयाबाहेर रांगा लावत असल्याचे दिसून येत आहे. मात्र मर्यादित सिलेंडर उपलब्ध असल्यामुळे सर्वांना गॅस मिळेलच याची खात्री नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील कुटुंबांना स्वयंपाकासाठी गॅसवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागते. त्यामुळे अचानक निर्माण झालेल्या या टंचाईमुळे अनेक घरांमध्ये स्वयंपाकाची मोठी अडचण निर्माण झाली आहे.
ग्रामीण भागात गॅस वितरणाची यंत्रणा आधीच मर्यादित असल्याने अशा आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा परिणाम अधिक तीव्रतेने जाणवत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. काही नागरिकांनी पर्याय म्हणून पुन्हा पारंपरिक इंधनाचा वापर सुरू केल्याचेही समोर आले आहे. मात्र यामुळे वेळ आणि श्रम दोन्ही वाढत असल्याची खंत महिलांकडून व्यक्त केली जात आहे.
वडगाव तळेगाव सह मावळ तालुक्यातील अनेक गावांमध्ये नागरिकांनी गॅस एजन्सीकडे वारंवार चौकशी करूनही सिलेंडर उपलब्ध होत नसल्याची तक्रार केली आहे. काही ठिकाणी बुकिंग करूनही अनेक दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
दरम्यान, संबंधित गॅस एजन्सींकडून पुरवठा लवकरच सुरळीत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत सिलेंडरची कमतरता जाणवत असल्याने नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम आता थेट ग्रामीण जनजीवनावर होत असल्याचे या परिस्थितीतून स्पष्ट होत असून गॅस पुरवठा लवकर सुरळीत व्हावा, अशी अपेक्षा मावळ तालुक्यातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.





