तळेगाव दाभाडे पोलिसांची कारवाई; दरोड्याच्या तयारीच्या संशयावरून पाच जणांविरुद्ध गुन्हा: हत्यारे व संशयास्पद साहित्य बाळगल्याचा आरोप
तळेगाव दाभाडे पोलिसांची कारवाई; दरोड्याच्या तयारीच्या संशयावरून पाच जणांविरुद्ध गुन्हा: हत्यारे व संशयास्पद साहित्य बाळगल्याचा आरोप
तळेगाव दाभाडे : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वडगाव फाट्याजवळ दरोड्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून पाच जणांविरुद्ध तळेगाव दाभाडे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे नऊच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. संशयितांकडे दरोड्यासाठी वापरले जाऊ शकणारे साहित्य व हत्यारे असल्याची माहिती पोलिसांच्या फिर्यादीत नमूद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव फाट्याजवळील वडाच्या झाडापासून सुमारे ३० मीटर अंतरावर, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) बांधकाम सुरू असलेल्या कंपाउंडलगत पाच जण संशयास्पद स्थितीत आढळले. दरोड्याच्या तयारीच्या संशयावरून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली.
या प्रकरणात आर्यन अनिल गरूड(वय १९, रा. तळेगाव दाभाडे), यश प्रल्हाद राजगुरू (वय १८, रा. संभाजीनगर, मावळ), विशाल शिवाजी गुंजाळ (वय २०, रा. भीमाशंकर कॉलनी परिसर, मावळ), गुरू संतोष गुंड (वय २४, रा. भेगडे आळी, तळेगाव दाभाडे) आणि हर्षल सतीश सोनवणे (वय १९, रा. टकले वस्ती, तळेगाव दाभाडे) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस शिपाई विशाल दादाराम थोरात (वय ३१) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४९५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१०(४), ३१०(५), भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित तरतुदींनुसार २६ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३८ मिनिटांनी गुन्हा दाखल करण्यात आला.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास
या प्रकरणाचा पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहेत. पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया डमाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कांबळे, पोलीस उपनिरीक्षक मोहारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गावडे तसेच संबंधित तपास पथकाच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे





