क्राईम

तळेगाव दाभाडे शहरात डिजिटल अरेस्ट चा धाक दाखवून २९ लाख ९९ हजारांची फसवणूक:सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून ज्येष्ठ नागरिकाला गंडा; तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल


तळेगाव दाभाडे शहरात डिजिटल अरेस्ट चा धाक दाखवून २९ लाख ९९ हजारांची फसवणूक:सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून ज्येष्ठ नागरिकाला गंडा; तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

 

 

तळेगाव दाभाडे : केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) अधिकारी असल्याचे भासवून मनी लाँडरिंग प्रकरणात अडकविण्याची भीती दाखवत तळेगाव दाभाडे येथील एका ५६ वर्षीय नागरिकाची तब्बल २९ लाख ९९ हजार रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. व्हॉट्सॲप व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क साधून बँक खात्यांची माहिती मिळविण्यात आली आणि विविध खात्यांमध्ये आरटीजीएसद्वारे रक्कम हस्तांतरित करण्यास भाग पाडल्याची तक्रार आहे. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केदार मालचंद्र बापट (वय ५६, रा. कल्पवृक्ष को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी, यशवंतनगर, तळेगाव दाभाडे) यांच्या तक्रारीवरून एस. के. जयस्वाल आणि समाधान पवार या दोघांविरुद्ध कारवाईची नोंद करण्यात आली आहे. संबंधित दोघांची पूर्ण नावे व पत्ते उपलब्ध नसल्याचे तक्रारीत नमूद आहे.

 

३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३६ वाजल्यापासून १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३७ वाजेपर्यंत हा प्रकार घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या कालावधीत बापट यांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर अनोळखी मोबाईल क्रमांकावरून व्हिडीओ कॉल आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने आपण सीबीआयमधील तपास अधिकारी एस. के. जयस्वाल असल्याचे सांगितले. जेट एअरवेजचे मालक नरेश गोयल यांनी ५३८ कोटी रुपयांचे मनी लाँडरिंग केल्याच्या प्रकरणात सीबीआयला २४७ बँक खाती आढळली असून, त्यापैकी एक खाते बापट यांच्या नावावर असल्याचा दावा करून त्यांना घाबरविण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

 

यानंतर त्यांच्या पंजाब नॅशनल बँकेतील मुदत ठेवी (फिक्स्ड डिपॉझिट) आणि म्युच्युअल फंडांची माहिती घेण्यात आली. संबंधितांनी आरटीजीएस व्यवहारांचे यूटीआर क्रमांक तपासले जातील, ते जुळल्यास दोषी ठरविण्यात येईल आणि जुळले नाहीत तर पाठवलेली रक्कम ७२ तासांत परत केली जाईल, असे सांगितल्याचा आरोप आहे. या आश्वासनावर विश्वास ठेवून बापट यांनी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे पाठविल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

 

त्यानुसार, अ‍ॅक्सिस बँकेच्या खात्यात १६ लाख ९४ हजार रुपये, सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या खात्यात ११ लाख रुपये आणि इंडियन बँकेच्या खात्यात दोन लाख पाच हजार रुपये, अशी एकूण २९ लाख ९९ हजार रुपयांची रक्कम आरटीजीएसद्वारे हस्तांतरित करण्यात आली. मात्र, पैसे परत न मिळाल्याने आपली ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्याचे बापट यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

 

या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४९७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१९(२), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० च्या कलम ६६(ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २६ ऑक्टोबर २०२६ रोजी या प्रकरणाची नोंद करण्यात आली. पोलीस निरीक्षक (गुन्हे) कांबळे तपास करीत असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

 

नागरिकांनी सतर्क राहावे : सीबीआय, पोलीस किंवा अन्य तपास यंत्रणांचे अधिकारी असल्याचे सांगून व्हिडीओ कॉलद्वारे धमकावणे, बँक खात्यांची माहिती मागणे किंवा पैसे हस्तांतरित करण्यास सांगणे, अशा प्रकारांना बळी पडू नये. अशा संशयास्पद कॉलची खातरजमा अधिकृत यंत्रणांकडून करावी. ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्यास तातडीने १९३० या राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा आणि cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *