तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत सत्तेची नवी मांडणी; भेगडे आडनावांची राजकीय बेरीज ठरतेय निर्णायक
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत सत्तेची नवी मांडणी; भेगडे आडनावांची राजकीय बेरीज ठरतेय निर्णायक
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या २०२६ ते २०३० या कालावधीसाठी स्थापन झालेल्या नव्या सभागृहामुळे शहराच्या राजकारणात नवे समीकरण पुढे आले आहे. यंदाच्या निवडणुकीत पक्षीय गणितांइतकेच नव्हे, तर आडनावनिहाय व कुटुंबनिहाय संख्याबळ अधिक ठळकपणे समोर आले असून, सत्तेचा नवा आराखडा आकाराला येताना दिसत आहे. २९ सदस्यांच्या या सभागृहात काही मोजक्या कुटुंबांची प्रभावी उपस्थिती असल्याने, आगामी पाच वर्षांचा कारभार कसा चालेल याबाबत उत्सुकता वाढली आहे.
भारतीय जनता पक्षाचे संतोष हरिभाऊ दाभाडे (पाटील )यांची नगराध्यक्षपदी निवड झाल्याने सत्ताधारी पक्षाला अधिकृत नेतृत्व मिळाले आहे. मात्र प्रत्यक्ष निर्णयप्रक्रियेत पक्षनिष्ठेपेक्षा वैयक्तिक प्रभाव, गटबाजी आणि परस्पर समन्वय अधिक महत्त्वाचा ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे नगरपरिषदेतील सत्ता ही एका पक्षापुरती मर्यादित न राहता, संख्याबळ असलेल्या गटांच्या सहमतीवर अवलंबून राहणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
या नव्या सभागृहात भेगडे आडनावाची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली आहे. आशा भेगडे, संतोष भेगडे, विनोद भेगडे, दीपक भेगडे आणि सुरेखा भेगडे असे पाच सदस्य निवडून आल्याने भेगडे कुटुंबाचे संख्याबळ सर्वाधिक आहे. नगराध्यक्षपद या कुटुंबाकडे नसले तरी, विविध समित्या, विकासकामांचे प्राधान्यक्रम आणि महत्त्वाच्या ठरावांवर या गटाचा प्रभाव राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याशिवाय भगत आडनावाचे निखिल भगत व डॉ. ऋतुजा भगत, शेळके आडनावाचे संदीप शेळके, अश्विनी शेळके व सुदाम शेळके, तर खांडगे आडनावाचे स्नेहा, चिराग व सत्यम खांडगे हेही संख्येने ठळक आहेत. अनिता पवार, सिद्धार्थ दाभाडे, गणेश काकडे, भारती धोत्रे, शैलजा काळोखे, मनीषा म्हाळसकर, हेमलता व संगीता खळदे, कमल टकले, इंद्रकुमार ओसवाल, सोनाली दरेकर, सागर बोडके .मजनू नाटेकर .सिया चिमटे .यांची उपस्थिती सभागृहातील विविधता अधोरेखित करते.
आगामी काळात पाणीपुरवठा, स्वच्छता, पायाभूत सुविधा आणि शहरविकास ही प्रमुख आव्हाने असणार आहेत. या प्रश्नांवर नगरपरिषद एकसंघपणे निर्णय घेते की आडनावांच्या आणि गटांच्या राजकारणात अडकते, यावर तळेगाव शहराची विकासाची दिशा ठरणार आहे. सत्ता, संख्याबळ आणि जबाबदारी यांचा समतोल साधण्याची खरी कसोटी आता सुरू झाली आहे.




