तळेगाव दाभाडेमध्ये भंगार व्यावसायिकांच्या स्पीकरमुळे ध्वनिप्रदूषणाचा कहर; नागरिक त्रस्त
तळेगाव दाभाडेमध्ये भंगार व्यावसायिकांच्या स्पीकरमुळे ध्वनिप्रदूषणाचा कहर; नागरिक त्रस्त
तळेगाव दाभाडे:
तळेगाव दाभाडे शहरात परप्रांतीय भंगार व्यवसाय करणाऱ्या टेम्पो चालकांकडून मोठ्या आवाजात स्पीकर लावून बेकायदेशीरपणे व्यवसाय केला जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शहरातील निवासी भागांत सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे टेम्पो फिरत असून, त्यांच्या कर्कश आवाजामुळे शांततेचा भंग होत आहे. परिणामी ज्येष्ठ नागरिक, आजारी रुग्ण, लहान मुले तसेच अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिक रहिवाशांच्या मते, या स्पीकरचा आवाज इतका प्रचंड असतो की घरात बसूनही अस्वस्थता जाणवते. काही ठिकाणी रस्त्यावरून जाताना वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून टेम्पो थांबवले जातात, त्यामुळे अपघाताचा धोका देखील वाढतो. विशेष बाब म्हणजे भंगार व्यवसायिक कोणतीही अधिकृत परवानगी न घेता व्यवसाय करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. तळेगाव शहर वाहतूक पोलीस आणि तळेगाव दाभाडे नगरपालिका यांनी संयुक्तपणे तातडीची कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. नियमबाह्य पद्धतीने मोठ्या आवाजात स्पीकर वापरणाऱ्यांवर केवळ दंडात्मक कारवाई न करता त्यांचे स्पीकर जप्त करावेत, तसेच वारंवार नियम मोडणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शहरातील सर्वच वसाहतींमध्ये हा त्रास जाणवत असून, ध्वनिप्रदूषण नियंत्रण कायद्याचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता तरी संबंधित यंत्रणांनी जागृत होऊन नागरिकांच्या शांततेसाठी ठोस पावले उचलावीत,विशेष म्हणजे, शहरात फिरणारे भंगार व्यवसायिक हे परप्रांतीय असून त्यांनी कोणतीही अधिकृत परवानगी न घेता अनधिकृतपणे व्यवसाय सुरू केला आहे. नियमांचे पालन न करता मोठ्या आवाजात स्पीकर वाजवत हे व्यावसायिक निवासी भागात मुक्तपणे फिरत असल्याने स्थानिक नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने अशा परप्रांतीय भंगार व्यवसायिकांची नोंदणी तपासून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.




