कामशेत शहर समस्यांच्या गर्तेत
कामशेत शहर समस्यांच्या गर्तेत
कामशेत :
शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाल्याच्या घोषणा सातत्याने होत असल्या, तरी प्रत्यक्षात कामशेत शहरातील नागरिकांना आजही मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत आहे. कचरा व्यवस्थापनाचा अभाव, पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई, अपुऱ्या आरोग्य सुविधा, वाढती वाहतूक कोंडी आणि गुन्हेगारी यामुळे कामशेत शहर समस्यांच्या विळख्यात अडकले असल्याचे चित्र आहे.
शहरात प्रभावी कचरा संकलन व प्रक्रिया यंत्रणा नसल्याने अनेक ठिकाणी रस्त्यांच्या कडेला कचऱ्याचे ढीग साचलेले दिसतात. परिणामी दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव वाढत असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत आरोग्य सुविधा अपुऱ्या असल्याने गंभीर रुग्णांना लोणावळा, तळेगाव किंवा पुण्याकडे धाव घ्यावी लागत आहे.
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे. अनियमित पाणीपुरवठ्यामुळे अनेक भागांतील नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत असून, कायमस्वरूपी जलस्रोत उभारण्याबाबत प्रशासनाकडून ठोस नियोजन नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
मुंबई–पुणे महामार्गावरील कामशेत घाट हा अपघातप्रवण ठरत आहे. अपुऱ्या सुरक्षात्मक उपाययोजना, वेग नियंत्रणाचा अभाव आणि वाहतूक व्यवस्थापनातील त्रुटींमुळे वारंवार भीषण अपघात घडत आहेत. काही दिवसांपूर्वी वारकऱ्यांच्या दिंडीत कंटेनर घुसून झालेल्या दुर्घटनेत जीवितहानी झाली होती. त्यातच शहरातील वाहतूक कोंडी ही नित्याची समस्या बनली आहे.
याशिवाय पैशांच्या देवाणघेवाणीवरून होणाऱ्या मारहाणी, तसेच स्वसंरक्षणाच्या नावाखाली घडणाऱ्या गोळीबाराच्या घटनांमुळे गुन्हेगारीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
विशेष बाब म्हणजे, शहरात केवळ एकच सार्वजनिक स्वच्छतागृह असून तेही अनेकदा बंद असते. त्यामुळे प्रवासी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
केवळ निधी मंजुरीच्या घोषणा न करता प्रत्यक्ष अंमलबजावणी करून या सर्व समस्यांवर तातडीने आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी कामशेतच्या नागरिकांकडून होत आहे.





