उंदीर-घुशींच्या दहशतीखाली तळेगाव; नगरपरिषद कुंभकर्णी निद्रेत, नागरिक संतप्त
उंदीर-घुशींच्या दहशतीखाली तळेगाव; नगरपरिषद कुंभकर्णी निद्रेत, नागरिक संतप्त
तळेगाव दाभाडे:
गणपती चौक ते घोरावाडी स्टेशन या वर्दळीच्या मार्गावर बंदिस्त गटारांची दयनीय अवस्था आणि नगरपरिषदेच्या निष्काळजीपणाचा फटका आता थेट नागरिकांच्या घराघरांपर्यंत पोहोचला आहे. गटारांची साफसफाई महिनोन्महिने ठप्प असल्याने उंदीर-घुशींनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
बंदिस्त गटारांमधील कचरा, चिखल आणि साचलेले सांडपाणी यामुळे दुर्गंधी तर असह्य झालीच आहे; पण त्याचबरोबर उंदीर-घुशींसाठी ही गटारे सुरक्षित आश्रयस्थान ठरत आहेत. तुटकी चेंबर झाकणे, उघडी गटारं आणि साफसफाईसाठी यंत्रसामग्रीचा अभाव यामुळे परिस्थिती हाताबाहेर जात आहे. नगरपरिषद प्रशासन केवळ कागदोपत्री कारवाई दाखवत असून प्रत्यक्षात मात्र परिसराचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे.
स्थानिक नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया देताना सांगितले की, “आम्ही कर भरतो, पण बदल्यात आजारी वातावरण मिळत आहे. उंदीर रात्री घरात शिरतात, कपाटं पोखरतात, अन्नसामग्री नासवतात. काही ठिकाणी तर घरांच्या भिंतींमध्ये मोठी बिळं पडली आहेत. उद्या घर कोसळलं तर जबाबदार कोण?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
विद्युत तारा चावल्यामुळे शॉर्टसर्किटचे प्रकार वाढत असून, आग लागण्याचा धोका नाकारता येत नाही. लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक सतत भीतीत राहत असून आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. उंदीर, डास, कीटक यांचा सुळसुळाट झाल्याने संसर्गजन्य आजार डोकं वर काढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
दरम्यान, काही बेजबाबदार नागरिक गटारांच्या तुटक्या झाकणांमधून थेट कचरा टाकत असल्याने गटारं पूर्णपणे बुजली आहेत. पाणी वाहून जाण्याचा मार्ग बंद झाल्यामुळे चिखल-कचऱ्याचे थर साचत असून हीच घाण उंदीर-घुशींची पैदास वाढवत आहे.
“नगरपरिषद जागी कधी येणार? उंदीर आमचे घर ताब्यात घेईपर्यंत का वाट पाहायची?” असा थेट सवाल नागरिक करत आहेत. तातडीने संपूर्ण गटारव्यवस्थेची स्वच्छता, तुटकी झाकणे बदलणे, उंदीर-नियंत्रण मोहीम राबवणे आणि कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी होत आहे.
नगरपरिषदेने वेळीच पावले उचलली नाहीत, तर हा प्रश्न लवकरच मोठ्या आरोग्य संकटात रूपांतरित होईल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.





