तळेगावात ‘रोजगार पर्व’ : इंद्रायणी संस्थेचा भव्य नोकरी महोत्सव २८ मार्चला. दिव्यांगांनाही संधी
तळेगावात ‘रोजगार पर्व’ : इंद्रायणी संस्थेचा भव्य नोकरी महोत्सव २८ मार्चला. दिव्यांगांनाही संधी
तळेगाव दाभाडे : औद्योगिक पट्ट्यातील बेरोजगार युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी ठरणारा ‘रोजगार पर्व’ तळेगावात साकारत असून, इंद्रायणी विद्यामंदिर संस्था यांच्या पुढाकारातून भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तळेगाव, चाकण, कान्हे, उर्से व टाकवे औद्योगिक क्षेत्रातील नामांकित कंपन्यांमध्ये थेट नोकरीची दारे खुली होणार असल्याची माहिती संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे आणि युवा उद्योजक रणजीत काकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हा नोकरी महोत्सव येत्या २८ मार्च रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत तळेगाव दाभाडे येथील यशोदा महादेव काकडे कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, इंद्रायणी महाविद्यालयाच्या परिसरात रंगणार आहे. या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, माजी मंत्री संजय उर्फ (बाळा) भेगडे, डीएमसीएफएसचे कार्यकारी संचालक डॉ. संजय झोपे, उद्योजक संजय साने, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, तहसीलदार वैशाली वाघमारे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
विशेष म्हणजे, दिव्यांगांनाही नोकरीची संधी मिळणार असून या नोकरी महोत्सवात शैक्षणिक पात्रतेचा विस्तृत पट समाविष्ट करण्यात आला आहे. पाचवी ते दहावी उत्तीर्ण, बारावी, डिप्लोमा, आयटीआय, अभियांत्रिकी, बी.एस्सी., एम.एस्सी., बी.ए., बी.कॉम, बी.बी.ए., बी.सी.ए. अशा विविध शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. औद्योगिक कंपन्यांचे थेट प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार असल्याने ‘एकाच छताखाली नोकरी’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरणार आहे.
या उपक्रमामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या शोधासाठी दूरवर भटकंती करण्याची गरज कमी होणार असून, औद्योगिक विकास आणि मानव संसाधन यांच्यातील दुवा अधिक बळकट होणार आहे. “युवकांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
महोत्सवाचे नियोजन अॅड. अभिजीत आवारे, विशाल लोखंडे आणि महेश निंबाळकर यांनी केले असून, संस्थेचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यासाठी परिश्रम घेतले आहेत. संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे आणि युवा उद्योजक रणजीत काकडे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम साकारत आहे.
तळेगाव औद्योगिक पट्ट्यात रोजगारनिर्मितीला चालना देणारा हा उपक्रम ठरणार असून, ‘नोकरीच्या शोधाला नवी दिशा’ देणारा हा महोत्सव युवकांसाठी आशेचा किरण ठरणार आहे.





