महत्त्वाचेशहर

तळेगावच्या विजय खिंडीत मराठ्यांनी रोखले ब्रिटिश साम्राज्याचे स्वप्न.९ जानेवारी १७७९ भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा तेजस्वी अध्याय


तळेगावच्या विजय खिंडीत मराठ्यांनी रोखले ब्रिटिश साम्राज्याचे स्वप्न.९ जानेवारी १७७९ भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा तेजस्वी अध्याय

 

तळेगाव दाभाडे:
तळेगाव दाभाडे येथील ऐतिहासिक विजय खिंडीत घडलेली घटना ही मराठ्यांच्या शौर्याचा, रणनितीचा आणि राष्ट्रनिष्ठेचा गौरवशाली अध्याय ठरली आहे. ९ जानेवारी १७७९ रोजी मराठ्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध दिलेला निर्णायक पराभव हा केवळ एक युद्धविजय नव्हता, तर भारत जिंकण्याच्या ब्रिटिशांच्या महत्त्वाकांक्षेवर बसलेला जबरदस्त आघात होता. आज या ऐतिहासिक घटनेचा विजय दिवस म्हणून गौरवाने स्मरण केला जात आहे.

१७७८ साली तत्कालीन ब्रिटिश अधिकारी वॉरन हेस्टिंग्स यांच्या आदेशानुसार संपूर्ण भारत पारतंत्र्यात आणण्याचा कट आखण्यात आला होता. पुणे जिंकणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. मुंबईहून मोठ्या तयारीनिशी निघालेल्या ब्रिटिश फौजांना मराठ्यांनी घाटमाथ्यावरच जबर प्रतिकार करण्याचे ठरवले. मराठ्यांच्या चपळ हालचाली, स्थानिक भौगोलिक ज्ञान आणि छापामार युद्धनीतीमुळे ब्रिटिश सैन्याची मोठी कुचंबणा झाली.

जसे ब्रिटिश सैन्य पुण्याच्या दिशेने पुढे सरकू लागले, तसे मराठ्यांनी त्यांचे परतीचे सर्व मार्ग बंद केले. ठिकठिकाणी हल्ले चढवून ब्रिटिश फौजांना अक्षरशः नामोहरम करण्यात आले. ३१ डिसेंबर १७७८ रोजी खंडाळा येथे कर्नल के मारला गेला, तर ४ जानेवारी १७७९ रोजी कार्ला येथे इस्टुर फाकडा ठार झाला. तळेगावच्या खिंडीत सरदार भिवराव पानसे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी तोफांचा भीषण मारा केला. या लढाईत तब्बल ४०० ते ५०० ब्रिटिश सैनिक मृत्युमुखी पडले.

या जबर पराभवानंतर माघारी फिरताना वडगाव येथे देखील ब्रिटिशांवर हल्ले झाले. अखेर ब्रिटिशांना संपूर्ण शरणागती पत्करावी लागली. शिंदे टेकडीवर श्रीमंत महादजी शिंदे आणि नाना फडणवीस यांच्याशी ब्रिटिशांनी अत्यंत नामुष्कीचा तह केला आणि परतण्याचा मार्ग स्वीकारला.

या ऐतिहासिक विजयाच्या स्मरणार्थ तळेगावच्या खिंडीत मारुतीची स्थापना करण्यात आली. विजयाच्या आनंदात श्रीमंत महादजी शिंदे तब्बल एक महिना तळेगाव येथे मुक्कामी राहिले. तळेगावचा हा विजय दिवस आजही प्रत्येक भारतीयाला स्वाभिमान, शौर्य आणि स्वातंत्र्याची प्रेरणा देत राहतो.

या संदर्भात बोलताना इतिहास संशोधक डॉ. प्रमोद बोराडे म्हणाले की,
तळेगावच्या विजय खिंडीत झालेला पराभव हा ब्रिटिश सत्तेसाठी अत्यंत धक्कादायक होता. मराठ्यांची रणनिती, स्थानिक भूगोलाचा अचूक वापर आणि सेनानींमधील समन्वय यामुळे ब्रिटिश सैन्य पूर्णपणे गोंधळून गेले. हा विजय केवळ लष्करी नव्हता, तर तो मराठ्यांच्या स्वराज्यनिष्ठेचा आणि राष्ट्रभक्तीचा ठोस पुरावा होता. या लढाईनंतर ब्रिटिशांना भारत जिंकणे इतके सोपे नाही, याची जाणीव झाली आणि त्यांचे विस्ताराचे स्वप्न तात्पुरते तरी उद्ध्वस्त झाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *