पवना जलवाहिनीला वेग, मावळात राजकीय दुटप्पीपणावर प्रश्नचिन्ह; शेतकऱ्यांचा संतप्त सवाल
पवना जलवाहिनीला वेग, मावळात राजकीय दुटप्पीपणावर प्रश्नचिन्ह; शेतकऱ्यांचा संतप्त सवाल
मावळ :
पिंपरी-चिंचवड शहराच्या दीर्घकालीन पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महत्त्वाचा मानला जाणारा पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प पुन्हा एकदा वेग घेताना दिसत आहे. अनेक वर्षे प्रशासकीय अडथळे, स्थानिक विरोध आणि राजकीय मतभेदांमुळे रखडलेल्या या प्रकल्पाला आता मुख्यमंत्री स्तरावरून चालना मिळत असल्याने नव्या घडामोडींना सुरुवात झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः उच्चस्तरीय बैठक बोलावून या प्रकल्पाचा आढावा घेण्याचे संकेत दिले आहेत. संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि तांत्रिक तज्ज्ञ यांना पाचारण करण्यात आले असून, प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी ठोस निर्णय लवकरच होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्रशासनाकडून हा प्रकल्प पिंपरी-चिंचवडकरांसाठी गेमचेंजर ठरणार असल्याचा दावा केला जात असला, तरी मावळात मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे.
मावळ तालुक्यात या प्रकल्पाला पूर्वीपासून तीव्र विरोध होत आला आहे. त्यामुळे प्रकल्पाला गती मिळताच राजकीय वातावरण पुन्हा ढवळून निघण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विशेषतःमावळ भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांची भूमिका काय असेल, तसेच पूर्वी आंदोलनात सक्रिय असलेल्या शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांचा सूर काय राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शेतकऱ्यांच्या हक्कांवर परिणाम होणार असल्याच्या भीतीने याआधी मोठे आंदोलन उभारण्यात आले होते. ९ ऑगस्ट २०११ रोजी बंदिस्त जलवाहिनीविरोधातील आंदोलनादरम्यान पोलिसांच्या गोळीबारात कांताबाई ठाकर, श्यामराव तुपे आणि मोरेश्वर साठे हे तीन शेतकरी शहीद झाले होते, तर अनेक जण जखमी झाले होते. त्या घटनेची जखम आजही मावळच्या जनतेच्या मनात ताजी आहे.
याच पार्श्वभूमीवर सध्याच्या राजकीय हालचालींवर शेतकरी वर्गाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तेव्हा आमच्यासोबत उभे राहिलेले नेते आज सत्तेत आहेत; आता तेच प्रकल्पाला गती देत असतील, तर त्यांच्या भूमिकेतील हा बदल का? असा थेट सवाल शेतकरी विचारत आहेत.
मावळातील शेतकरी सध्या संभ्रमात असून, त्यांच्या जमिनी, पाणीहक्क आणि पुनर्वसनाच्या मुद्द्यांवर स्पष्ट हमी मिळावी, अशी त्यांची मागणी आहे. राजकारण बाजूला ठेवून आमच्या प्रश्नांना प्राधान्य द्या, अशी भावनिक प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांनी दिली.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या आणि वाढती पाण्याची मागणी लक्षात घेता हा प्रकल्प आवश्यक असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, मावळ च्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे हित आणि शहराचा विकास यामध्ये संतुलन साधणे ही मोठी कसोटी ठरणार आहे.
एकूणच, पवना जलवाहिनी प्रकल्पाला वेग देताना राजकीय नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करणे आणि शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करणे अत्यावश्यक ठरणार आहे. अन्यथा, पुन्हा एकदा मावळची भूमी संघर्षाच्या ज्वाळांनी पेटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.





