राजकीय

आमदार सुनील शेळके यांच्या नावाची मंत्रिपदासाठी जोरदार चर्चा:मावळला पुन्हा लाल दिवा मिळणार का?


आमदार सुनील शेळके यांच्या नावाची मंत्रिपदासाठी जोरदार चर्चा:मावळला पुन्हा लाल दिवा मिळणार का?

मावळ : राज्याच्या राजकारणात संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग येत असतानाच मावळ तालुक्यातही राजकीय चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांच्या नावाची राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त होत असून, त्यामुळे मावळला पुन्हा एकदा लाल दिवा मिळणार का? याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

राज्यातील बदलते राजकीय समीकरण, पक्षांतर्गत फेरबदल आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पश्चिम महाराष्ट्रात संघटनात्मक बळकटीसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची चर्चा रंगली आहे. त्यात आमदार सुनील शेळके यांचे नाव आघाडीवर असल्याने तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

मावळमध्ये गेल्या काही वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना मजबूत करण्यात शेळके यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाला मिळालेले यश हे त्यांच्या राजकीय नेतृत्वाचे फलित मानले जात आहे. लोणावळा नगरपरिषद, तळेगाव दाभाडे नगरपरिषद, वडगाव नगरपंचायत तसेच पंचायत समित्यांमध्ये पक्षाची मजबूत पकड निर्माण करण्यात त्यांनी प्रभावी कामगिरी केल्याचे बोलले जाते. त्यामुळे पक्षश्रेष्ठींकडे त्यांचे राजकीय वजन वाढल्याची चर्चा कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.

सध्या विधानसभेच्या उपाध्यक्षपदाची धुरा अण्णा बनसोडे यांच्याकडे असली तरी पक्षात नव्या चेहऱ्यांना संधी देण्याबाबत हालचाली सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. जनाधार असलेल्या नेतृत्वाला मंत्रिमंडळात स्थान देण्याच्या दृष्टीने पक्ष नेतृत्व सकारात्मक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

मावळच्या राजकीय इतिहासात यापूर्वी मदन बाफना आणि संजय उर्फ बाळा भेगडे यांना मंत्रीपदाचा मान मिळाला होता. आता त्याच परंपरेत आमदार सुनील शेळके यांच्या नावाची चर्चा रंगू लागल्याने मावळ तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी मावळला पुन्हा लाल दिवा मिळणार का? हा प्रश्न सध्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. आगामी काही दिवसांत राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त होत असून, मावळचे राजकीय भवितव्य कोणत्या दिशेने वळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *