राजकीय

मावळ बाजार समितीत राष्ट्रवादीला धक्का; सभापतीपदी भाजपचे सुभाष जाधव विजयी


मावळ बाजार समितीत राष्ट्रवादीला धक्का; सभापतीपदी भाजपचे सुभाष जाधव विजयी

वडगाव (मावळ) :मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून भाजपचे उमेदवार सुभाष जाधव यांनी विजय मिळवला आहे. माजी सभापती संभाजी शिंदे आणि उपसभापती नामदेव शेलार यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदांसाठी सहकार उपनिबंधक कार्यालयात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.
सभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विक्रम कलावडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, तर भाजपकडून सुभाष जाधव रिंगणात होते. गुप्त मतदान पद्धतीने झालेल्या निवडणुकीत जाधव यांना ११ मते मिळाली, तर कलावडे यांना केवळ ७ मतांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे स्पष्ट बहुमत असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला.
दरम्यान, उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादीचे विलास बबन मानकर आणि भाजपचे साईनाथ मांडेकर यांच्यात लढत अपेक्षित होती. मात्र, मांडेकर यांनी माघार घेतल्याने मानकर यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी सर्जेराव कांदळकर यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली.
मावळ बाजार समितीत एकूण १८ संचालक असून त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे १२, भाजपचे ५ आणि काँग्रेसचा १ संचालक आहे. असे स्पष्ट बहुमत असतानाही राष्ट्रवादीच्या चार ते पाच मतांची फूट पडल्याचे या निकालावरून स्पष्ट झाले आहे. या घडामोडींमुळे पक्षांतर्गत नाराजी आणि गटबाजी उघड झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
यापूर्वी सर्व संचालकांना कालावधीप्रमाणे सभापती व उपसभापती पदाची संधी देण्याचा फॉर्म्युला ठरवण्यात आला होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय समीकरणे बदलली. याच परिस्थितीचा फायदा घेत भाजपने अनपेक्षित विजय मिळवत सत्ता समीकरणात महत्त्वाचा बदल घडवून आणला आहे.
या निकालामुळे मावळ तालुक्यातील राजकारणात नव्या घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *