राजकीयसामाजिक

नगराध्यक्षा अबोली मयूर ढोरे यांच्या माध्यमातून ठाकर समाजातील १३ कुटुंबीयांना जातीचे दाखले वाटप.वर्षानुवर्षांचा प्रश्न मार्गी


नगराध्यक्षा अबोली मयूर ढोरे यांच्या माध्यमातून ठाकर समाजातील १३ कुटुंबीयांना जातीचे दाखले वाटप.वर्षानुवर्षांचा प्रश्न मार्गी

 

वडगाव:

वडगाव शहरातील ठाकर समाजातील वंचित व गरजू कुटुंबीयांना जातीचे दाखले मिळावेत, यासाठी अनेक वर्षांपासून सुरू असलेला पाठपुरावा अखेर यशस्वी ठरला असून, आज सुमारे १३ कुटुंबीयांना अधिकृत जातीचे दाखले प्रदान करण्यात आले. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या पुढाकारातून मोरया प्रतिष्ठानच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.

 

वडगाव नगरपंचायतीच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. अबोली मयूर ढोरे, नगरसेवक अजय भवार आणि नगरसेवक गौतम सोनवणे यांच्या शुभहस्ते ठाकर समाजातील लाभार्थ्यांना जातीचे दाखले वितरित करण्यात आले. या कार्यक्रमामुळे समाजातील अनेक कुटुंबीयांचा वर्षानुवर्षांचा ज्वलंत प्रश्न मार्गी लागला आहे.

 

यावेळी बोलताना नगराध्यक्षा सौ. अबोली मयूर ढोरे यांनी सांगितले की, ठाकर समाजातील अनेक कुटुंबीय शिक्षण, नोकरी तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांपासून केवळ जातीच्या दाखल्याअभावी वंचित राहिले होते. पूर्वज शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर असल्याने तसेच अनेक कुटुंबे भूमिहीन असल्याने आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करणे त्यांच्यासाठी मोठे आव्हान ठरत होते. त्यामुळे सरकारी कार्यालयांचे हेलपाटे, मानसिक त्रास आणि वेळेचा अपव्यय सहन करावा लागत होता. हा त्रास कमी करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करून आज प्रत्यक्षात जातीचे दाखले देऊ शकल्याचे समाधान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

 

या कामात आमदार सुनील शेळके यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे विशेष सहकार्य लाभले असून, विशेषतः श्री. रुपेशजी सोनुने यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हा प्रश्न निकाली निघू शकला. मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातूनही समाजातील बांधवांना आवश्यक मार्गदर्शन आणि मदत मिळाली.

 

दरम्यान, आज जरी १३ कुटुंबीयांना जातीचे दाखले देण्यात आले असले, तरी वडगाव शहरातील ठाकर समाजातील काही कुटुंबीय अजूनही दाखल्यांपासून वंचित आहेत. त्यांच्यासाठी शासनस्तरावर पुढील काळात पाठपुरावा सुरूच राहणार असल्याची माहिती नगराध्यक्षा अबोली ढोरे यांनी दिली.

 

जातीचे दाखले मिळाल्यामुळे ठाकर समाजातील लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त करत आमदार सुनील शेळके तसेच माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे आणि नगरपंचायतीचे आभार मानले. यामुळे आता त्यांच्या मुलांना शिक्षण, शिष्यवृत्ती, आरक्षण तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेणे सुलभ होणार आहे.

 

येत्या कालावधीत केंद्र व राज्य शासनाच्या विविध हितकारक योजना, महिला व बालकल्याण विभागाच्या योजना तसेच वडगाव नगरपंचायतीच्या माध्यमातून महिला बचत गटांची स्थापना करून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत विकासाच्या योजना पोहोचविण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचेही नगराध्यक्षा सौ. अबोली मयूर ढोरे यांनी यावेळी स्पष्ट केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *