महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीत धनंजय वाडेकर यांची बिनविरोध निवड
*महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीत धनंजय वाडेकर यांची बिनविरोध निवड*
तळेगाव दाभाडे :
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देणारे तळेगाव शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. धनंजय वाडेकर यांची महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या सन २०२६ ते २०३० या कालावधीसाठी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे शिक्षण क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रातही समाधान व्यक्त केले जात आहे.
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था ही देशातील नामांकित व अग्रगण्य शैक्षणिक संस्था म्हणून ओळखली जाते. संस्थेच्या अखत्यारित ७७ युनिट्स असून, सुमारे ३५ हजार विद्यार्थीनी येथे शिक्षण घेत आहेत. महिलांच्या शिक्षणासाठी सातत्याने भरीव कार्य करणाऱ्या या संस्थेच्या कार्यकारिणीत श्री. वाडेकर यांचा समावेश होणे ही संस्थेसाठी महत्त्वाची बाब मानली जात आहे.
श्री. धनंजय वाडेकर यांनी लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघात विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या असून, स्वयंसेवक, गटनायक ते जिल्हा व्यवस्था प्रमुख अशी उल्लेखनीय वाटचाल केली आहे. तसेच ते स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानचे संस्थापक सदस्य व अध्यक्ष असून, स्वातंत्र्यवीर सावरकर गुरुकुलाची स्थापना त्यांनी केली आहे.
गेली दहा वर्षे कामशेट येथील आश्रम शाळेच्या शाळा समितीचे सदस्य म्हणून कार्यरत राहून त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी अनेक उपक्रम राबवले. विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, तसेच आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले आहेत.
तळेगाव शहरातील अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचे निकटचे संबंध असून, त्यांच्या या बिनविरोध निवडीचे तळेगाव शहरात सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि कार्याचा लाभ महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेला निश्चितच होईल, अशी भावना व्यक्त होत आहे.





