महत्त्वाचे

लोणावळा येथील नॉर्थ पॉइंट आणि थ्री सिक्सटी रिसॉर्ट परिसरात भीषण भूस्खलन:दोन जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, बचावकार्य युद्धपातळीवर


लोणावळा येथील नॉर्थ पॉइंट आणि थ्री सिक्सटी रिसॉर्ट परिसरात भीषण भूस्खलन:दोन जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, बचावकार्य युद्धपातळीवर

लोणावळा, (प्रतिनिधी )
सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे डोंगररांगांमध्ये दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच लोणावळ्यातील थ्री सिक्सटी रिसॉर्ट परिसरात मंगळवारी (७ जुलै) रोजी भीषण भूस्खलनाची घटना घडली. या दुर्घटनेत दोन व्यक्ती मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून त्यांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर बचाव मोहीम सुरू केली आहे.

नॉर्थ पॉइंट आणि थ्री सिक्सटी रिसॉर्ट परिसरात अचानक मोठ्या प्रमाणावर माती व दगडांचा ढिगारा कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच महसूल, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन विभाग तसेच स्थानिक बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. उपविभागीय अधिकारी (एसडीओ) महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली यंत्रसामग्रीच्या सहाय्याने ढिगारा हटविण्याचे काम वेगाने सुरू असून अडकलेल्या व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, राज्यभर सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांत पूर, झाडे उन्मळून पडणे, घरांचे नुकसान आणि दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. लोणावळा घाट परिसरातही गेल्या काही दिवसांत दरडी कोसळण्याच्या घटना वाढल्याने प्रशासनाने विशेष सतर्कता बाळगली आहे.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी लोणावळ्यातील पर्यटनस्थळांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) अंतर्गत कलम १६३ लागू केले असून काही ठिकाणी पर्यटकांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत. नागरिकांनी तसेच पर्यटकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि धोकादायक डोंगरकडे व दरडप्रवण भागात जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *