महत्त्वाचे

मावळ मधील २३ दरडप्रवण गावांचा प्रश्न ऐरणीवर: कायमस्वरूपी उपाययोजना कधी?


मावळ मधील २३ दरडप्रवण गावांचा प्रश्न ऐरणीवर: कायमस्वरूपी उपाययोजना कधी?

मावळ (प्रतिनिधी ):मावळ तालुक्यातील एकूण १८७ गावांपैकी तब्बल २३ गावे दरडप्रवण क्षेत्रात असल्याचे विविध तज्ज्ञांच्या अभ्यासातून आणि जिल्हा प्रशासनाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. डोंगरउतार, घाटमाथा आणि अतिवृष्टीच्या पट्ट्यात वसलेल्या या गावांमध्ये प्रत्येक पावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका कायम असतो. मात्र वर्षानुवर्षे केवळ सर्वेक्षणे, पंचनामे आणि सतर्कतेच्या सूचना देण्यापलीकडे ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

विसापूर किल्ला परिसरातील पाटण, भुशी तसेच लोणावळा आणि मावळातील अन्य दुर्गम डोंगराळ भाग दरडप्रवण म्हणून ओळखले जातात. यापूर्वी अनेक ठिकाणी दरडी कोसळून घरे उद्ध्वस्त झाली, कुटुंबे बेघर झाली, तर अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला. प्रत्येक दुर्घटनेनंतर प्रशासनाकडून उच्चस्तरीय बैठका, पाहण्या आणि सर्वेक्षणांची घोषणा केली जाते. मात्र कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रश्न आजही प्रलंबितच असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

दरडप्रवण क्षेत्रातील कुटुंबांचे सुरक्षित ठिकाणी कायमस्वरूपी स्थलांतर का केले जात नाही, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. संभाव्य धोका माहिती असतानाही केवळ सतर्क राहा अशा सूचना देऊन प्रशासन जबाबदारी झटकत असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे. पावसाळा सुरू झाला की भीतीच्या छायेत जगण्याची वेळ या गावांवर येते.

पत्रकार आणि सामाजिक संघटना सातत्याने या गंभीर प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधत आहेत. विविध माध्यमांतून वारंवार बातम्या प्रसिद्ध होऊनही संबंधित यंत्रणांकडून प्रभावी कृती होत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. मानवी जीवितहानी झाल्यानंतर मदतीच्या घोषणा करण्याऐवजी दुर्घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबविणे हीच काळाची गरज असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत.

दरड कोसळल्यानंतर मदतकार्य करण्यापेक्षा ती दुर्घटना घडूच नये, यासाठी शासन आणि प्रशासनाने तातडीने ठोस पुनर्वसन धोरण, संरक्षणात्मक उपाययोजना आणि निधीची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. अन्यथा प्रत्येक पावसाळ्यात निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात घालणाऱ्या या व्यवस्थेची नैतिक जबाबदारी नेमकी कोण स्वीकारणार, असा संतप्त सवाल मावळवासीयांकडून उपस्थित केला जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *