शिक्षण-प्रशिक्षण

आई-वडिलांच्या कष्टांना यशाची सलामी:तळेगाव शहरातील साठे कुटुंबातील तीन भावंडांची महाराष्ट्र पोलीस दलात भरारी


आई-वडिलांच्या कष्टांना यशाची सलामी:तळेगाव शहरातील साठे कुटुंबातील तीन भावंडांची महाराष्ट्र पोलीस दलात भरारी

तळेगाव दाभाडे : प्रतिकूल परिस्थितीवर जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर मात करत तळेगाव दाभाडे येथील साठे कुटुंबाने प्रेरणादायी यशोगाथा घडविली आहे. आई-वडिलांच्या अथक परिश्रमाचे चीज करत एकाच घरातील स्वराज, प्रतीक आणि प्रतीक्षा साठे ही तीनही भावंडे महाराष्ट्र पोलीस दलात दाखल झाली असून, त्यांच्या यशाने संपूर्ण तळेगाव आणि मावळ परिसराचा गौरव वाढविला आहे.

या यशामागे वडील आनंदा साठे आणि आई संगीता साठे यांचा संघर्षमय प्रवास दडलेला आहे. मुलांनी उच्च शिक्षण घेऊन समाजात स्वतःचे स्थान निर्माण करावे, या ध्येयाने त्यांनी मुंबईत मिळेल ते काम करत संसाराचा गाडा ओढला. स्वतःच्या गरजांवर मर्यादा आणत मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना पुण्यात पाठविले. या संपूर्ण वाटचालीत मामा मच्छिंद्र भोसले यांनीही मोलाची साथ देत कुटुंबाला बळ दिले.

मोठे बंधू स्वराज साठे सध्या तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कर्तव्य बजावत आहेत. त्यानंतर भाऊ प्रतीक साठे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत पोलीस उपनिरीक्षक (PSI) पद गाठले असून, सध्या ते नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीत प्रशिक्षण घेत आहेत. धाकटी बहीण प्रतीक्षा साठे हिनेही खाकी वर्दीचे स्वप्न साकार करत प्रशिक्षण पूर्ण केले असून, मुंबईतील आर्थर रोड कारागृहात ती जबाबदारीने सेवा बजावत आहे.

एकाच कुटुंबातील तीन भावंडांनी पोलीस दलात स्थान मिळविण्याची ही दुर्मिळ कामगिरी समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. जिद्द, सातत्य आणि पालकांच्या त्यागाच्या बळावर कोणतेही स्वप्न साकार होऊ शकते, याची साठे कुटुंबाची ही यशोगाथा जिवंत साक्ष आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या ग्रामीण भागातील युवक-युवतींसाठी ही कथा प्रेरणेचा दीप ठरत असून, साठे कुटुंबावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *