शिक्षण-प्रशिक्षणसामाजिक

नव्या रंगात अंगणवाड्या .वडगाव मावळात बालविकासाला नवे बळ


नव्या रंगात अंगणवाड्या .वडगाव मावळात बालविकासाला नवे बळ

वडगाव मावळ (ता. मावळ) : ग्रामीण भागातील बालविकास अधिक सक्षम व्हावा, या उद्देशाने वडगाव मावळ येथे पाच अंगणवाड्यांचे नूतनीकरण यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहे. ऍटलास कॉपको कंपनी व होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पंचमुखी, ठाकरवाडी, बाजारपेठ, मधुबन व कातवी येथील अंगणवाड्यांचा कायापालट करण्यात आला. या नूतनीकरण केलेल्या अंगणवाड्यांचा उद्घाटन सोहळा मंगळवार, दि. 13 जानेवारी 2026 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

उद्घाटन कार्यक्रमास होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ. कॅरोलिन मॅडम, संस्थेचे सीईओ शकील शेख तसेच एज्युकेशन मॅनेजर वैशाली पवार मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. ऍटलास कॉपको कंपनीकडून एचआर मॅनेजर विभूती पांड्या, शेक मॅनेजर भूषण काटकर, इंजिनिअरिंग हेड योगेश वडुंकर आणि सेल्स अँड सर्व्हिस हेड सुरेंद्र सिंग यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते. त्यांच्या सहभागामुळे या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

यावेळी ACEF संस्थेचे जनरल सेक्रेटरी गणेश गवारे व AVEF संस्थेचे व्हाइस प्रेसिडेंट गणेश शिवले यांनीही उपस्थित राहून या सामाजिक उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. बालविकास प्रकल्प अधिकारी (CDPO) संध्या नगरकर मॅडम व संबंधित विभागाच्या सुपरवायझर संगीता ठाकूर मॅडम यांच्या उपस्थितीमुळे प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांमधील समन्वय अधोरेखित झाला.

नूतनीकरण प्रकल्पाअंतर्गत अंगणवाड्यांमध्ये स्वच्छता व्यवस्था सुधारण्यात आली असून, पिण्याच्या पाण्याची सोय, शौचालयांची दुरुस्ती, आकर्षक रंगकाम तसेच सुरक्षित व आनंददायी शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे लहान बालकांसाठी अंगणवाडी हे केवळ शिक्षणाचेच नव्हे तर आरोग्यदायी व सुरक्षित वातावरण देणारे केंद्र ठरणार आहे.

या संपूर्ण प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी समन्वयक म्हणून अश्विनी हेंद्रे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. स्थानिक पातळीवरील नियोजन, विविध यंत्रणांमधील समन्वय व प्रभावी देखरेखीमुळे हा उपक्रम वेळेत पूर्ण होऊ शकला.

कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (CSR) अंतर्गत राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील बालविकासाला नवी दिशा मिळाली आहे. सामाजिक संस्था व उद्योगविश्वाच्या सहकार्याने राबविलेले हे प्रेरणादायी पाऊल भविष्यात अनेक बालकांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *