शहर

नवलाख उंबर येथे रसायन वाहतूक करणाऱ्या टेम्पोला भीषण आग


नवलाख उंबर येथे रसायन वाहतूक करणाऱ्या टेम्पोला भीषण आग

नवलाख उंबरे (मावळ) : तळेगाव एमआयडीसीतील नवलाख उंबर परिसरात शनिवारी (22 ऑगस्ट) सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास रासायनिक पदार्थ वाहून नेणाऱ्या टेम्पोला अचानक आग लागल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली. क्षणार्धात आगीने रौद्र रूप धारण केल्याने टेम्पोमधील साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

टेम्पोला आग लागल्याची माहिती मिळताच तळेगाव एमआयडीसी अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाच्या जवानांनी बंबाच्या सहाय्याने पाण्याचा मारा करीत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. काही वेळाच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाला यश आले.

दरम्यान, या दुर्घटनेत टेम्पोचालक सुदैवाने बचावला. मात्र, आगीची तीव्रता अधिक असल्याने टेम्पो आणि त्यातील रासायनिक माल मोठ्या प्रमाणात जळून खाक झाला. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते.

घटनेनंतर नवलाख उंबर परिसरातील रस्त्यावर काही काळ वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अग्निशामक दलाच्या तत्पर कारवाईमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला. टेम्पोला आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, याबाबत संबंधित यंत्रणेकडून तपास करण्यात येत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *