महत्त्वाचे

मावळच्या पर्यटनाला नवी झेप:स्वर्गीय अजित पवारांच्या योगदानातून लोणावळ्यात ग्लास स्कायवॉक साकारण्यास वेग आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश


मावळच्या पर्यटनाला नवी झेप:स्वर्गीय अजित पवारांच्या योगदानातून लोणावळ्यात ग्लास स्कायवॉक साकारण्यास वेग आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

 

लोणावळा : मावळ तालुक्याच्या पर्यटन विकासाला नवी झेप देणाऱ्या बहुप्रतीक्षित लोणावळ्यातील ग्लास स्कायवॉक प्रकल्पाला अखेर प्रत्यक्ष गती मिळाली आहे. कुरवंडे परिसरातील टायगर पॉइंट आणि लायन्स पॉइंट येथे प्रस्तावित सुमारे 125 मीटर लांबीच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या निविदेचा मसुदा अंतिम करण्यात आला असून, निविदा प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्य शासनाने या प्रकल्पासाठी 333 कोटी 56 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मावळच्या पर्यटन क्षेत्राचा चेहरामोहरा बदलण्याची क्षमता असलेल्या या प्रकल्पासाठी स्वर्गीय अजित पवार यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याला स्वर्गीय अजित पवार यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून पुढे आली आहे.

या प्रकल्पासाठी आमदार सुनील शेळके यांनी सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा केला. मावळच्या पर्यटन क्षमतेला व्यापक व्यासपीठ मिळावे, लोणावळा-खंडाळा पर्यटन पट्ट्यात नवे आकर्षण निर्माण व्हावे आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने त्यांनी प्रयत्न केले. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून प्रकल्पाला मंजुरी मिळवून देण्यासाठी झालेल्या प्रयत्नांना आता मूर्त स्वरूप येत आहे.

सार्वजनिक खासगी भागीदारी अर्थात पीपीपी तत्त्वावर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि संबंधित यंत्रणांकडून निविदा प्रक्रिया पुढे नेण्यासाठी कार्यवाही सुरू आहे.

पिंपरी-चिंचवड येथील कार्यालयात झालेल्या निविदा छाननी समितीच्या बैठकीत निविदा मसुद्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रकल्पाला आवश्यक तांत्रिक मान्यता मिळाली असून दर विश्लेषणाची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत प्रत्यक्ष निविदा प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.

125मीटरचा काचेचा पूल

पुणे जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ परिसर विकास योजनेअंतर्गत हाती घेण्यात आलेल्या या प्रकल्पात सुमारे 125 मीटर लांबीचा काचेचा पूल उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये सुमारे 23मीटर लांबीचा कॅंटिलीव्हर भाग प्रस्तावित आहे. या स्कायवॉकवरून पर्यटकांना लोणावळ्याच्या दऱ्या, डोंगररांगा आणि हिरवाईचे विहंगम दृश्य अनुभवता येणार आहे.

मावळच्या पर्यटन नकाशावर हा प्रकल्प नवे आकर्षण ठरणार असून, टायगर पॉइंटचा निसर्गरम्य परिसर आणि काचेच्या पुलावरून मिळणारा थरारक अनुभव पर्यटकांसाठी विशेष पर्वणी ठरणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *