अथर्वशीर्षाच्या मंगलमंत्रांनी तळेगाव दाभाडे शहर भक्तिमय:तीन हजार महिला-भगिनींच्या सामूहिक पठणाने गणेशभक्तीचा जागर
अथर्वशीर्षाच्या मंगलमंत्रांनी तळेगाव दाभाडे शहर भक्तिमय:तीन हजार महिला-भगिनींच्या सामूहिक पठणाने गणेशभक्तीचा जागर
तळेगाव दाभाडे : गणरायाच्या मंगलमय आगमनानिमित्त श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्था आणि मानाचा पाचवा गणपती श्री गणेश तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामूहिक अथर्वशीर्ष पठणाने तळेगाव दाभाडे शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. अथर्वशीर्ष पठणाचे हे १३ वे वर्ष असून, यंदाही सुमारे तीन हजार महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक आणि गणेशभक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात आणि अथर्वशीर्षाच्या मंगलमंत्रांच्या सामूहिक स्वरांनी परिसरातील वातावरण भारावून गेले. भक्तिभावाने एकसुरात झालेले पठण हा उपस्थितांसाठी आध्यात्मिक अनुभूती देणारा क्षण ठरला. गणरायाच्या चरणी सुख, समृद्धी, आरोग्य आणि समाजकल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली.
या उपक्रमाचा विस्तार करत कामशेत, सोमाटणे फाटा आणि श्री क्षेत्र देहू येथेही सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचे कार्यक्रम संपन्न झाले.
कार्यक्रमाचे नियोजन श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे आधारस्तंभ तथा तळेगाव दाभाडे नगरपरिषद विरोधी पक्षनेते संतोष छबुराव भेगडे, पतसंस्थेचे अध्यक्ष शरद भोंगाडे, उपाध्यक्ष समीर भेगडे, तसेच शंकर भेगडे, अमित भसे, अंकुश आंबेकर, अतुल राऊत, संध्या देसाई, नूतन भेगडे, राहुल पंढरीनाथ पारगे, अरविंद गद्रे, राकेश खळदे, अनिल भोमे, श्रीकांत मेंढी, अनिल फाकटकर, श्रवण मेहता, बाळासाहेब वाजे आदींनी केले.
यावेळी संतोष भेगडे यांनी सर्व गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल पारगे यांनी केले, तर पतसंस्थेचे अध्यक्ष शरद भोंगाडे यांनी आभार मानले.




